नवी दिल्ली : आधार कार्डची आवश्यकता सध्या देशातील एक चर्चेचा विषय बनला आहे. आधार कार्ड किती फायदेशीर आहे याचचं एक उदाहरण जयपूरमध्ये समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधार कार्ड देशभरात सर्वच महत्वाच्या कामांसाठी आवश्यक केलं आहे. अनेकजण याचा विरोध करत आहेत. मात्र, आधार कार्डमुळे चक्क एक हरवलेला मुलगा आपल्या आईला भेटल्याचं पहायला मिळालं आहे.


जयपूरमध्ये राहणारा १५ वर्षीय सोनू जानेवारी २०१५ मध्ये अजमेर रोड धावास येथून बेपत्ता झाला होता. त्यानंतर तो बंगळुरुतील मनोरुग्णालयात पोहोचला. 


मनोरुग्णालयात पोहोचलेल्या सोनूचं आधार कार्ड बनविण्याची प्रक्रिया सुरु झाली तेव्हा कळालं की, त्याचं आधारकार्ड यापूर्वीच बनलेलं आहे. तसेच त्या आधार कार्डमध्ये जयपूरचा पत्ता आहे.  त्यानंतर आधार कार्डच्या मदतीने सोनूची आई मेहरून्निसाला बंगळुरुमध्ये फोन करुन कळविण्यात आलं.


रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मेहरून्निसा यांच्या मोबाइलवर सोनूचा फोटो पाठविला. तो फोटो पाहून मेहरून्निसा यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर मेहरून्निसा यांनी थेट बंगळुरू गाठलं आणि सोनूला आपल्या ताब्यात घेतलं. 


बंगळुरुतील ज्या मनोरुग्णालयात सोनू राहत होता त्या ठिकाणी जुलै महिन्यात आधार कार्ड बनविण्यास सुरुवात झाली होती. जवळपास सर्वच मुलांचे आधार कार्ड बनविण्यात आले होते. मात्र, सोनूचं रिजेक्ट होत होतं. तीन वेळा त्याचं आधार कार्ड बनविण्याचा प्रयत्न केला मात्र, तिन्ही वेळा रिजेक्ट करण्यात आलं. 


आधार कार्ड अॅप्लिकेशन रद्द होण्यामागचं कारण शोधलं असता कळालं की, सोनूचं आधार कार्ड या पूर्वीच बनलं आहे. त्यामुळेच सोनूचं आधार कार्ड पून्हा बनवता येत नव्हत. अशा प्रकारे आधार कार्डच्या मदतीने हरविलेला सोनू आपल्या आईला भेटला.