नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत, अशा शुभेच्छा समाजवादी पक्षाचे नेते आणि खासदार मुलायम सिंह यादव यांनी बुधवारी दिल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. एकीकडे मोदी यांना पराभूत करण्यासाठी सर्वच विरोधक एकत्र आले असताना दुसरीकडे मुलायम सिंह यादव यांनी मोदींचे लोकसभेत कौतुक केले. ते सर्वांना घेऊन पुढे जात आहेत, असेही वक्तव्य मुलायम सिंह यादव यांनी केले. मुलायम सिंह यादव यांच्या याच वक्तव्यावर आता एकेकाळी त्याचे एकदम घनिष्ठ सहकारी असलेले खासदार अमर सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरच्या माध्यमातून अमर सिंह यांनी आपली प्रतिक्रिया दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकांमध्ये केवळ गोंधळ निर्माण करण्यासाठीच मुलायम सिंह यादव यांनी हे वक्तव्य केले आहे. मुलायम सिंह यादव आणि मायावती यांच्या नेतृत्त्वाखाली नोएडाला लुटणाऱ्या चंद्रकला आणि रमा रमण यांना वाचविण्यासाठी त्यांनी हे विधान केले असल्याचे अमर सिंह यांनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणात मोदी यांनी शांत राहावे, यासाठी मुलायम सिंह यादव धडपड करीत असल्याचे अमर सिंह यांनी ट्विटच्या माध्यमातून लिहिले आहे. अमर सिंह यांच्या या प्रतिक्रियेमुळेही अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.



लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बुधवारी शेवटचा दिवस होता. सोळाव्या लोकसभेचे हे शेवटचे अधिवेशन होते. त्यामुळे यावेळी अनेक सदस्यांनी आपल्या निरोपाच्या भावना व्यक्त केल्या. मुलायम सिंह यादव यांनी निरोपाच्या भाषणात सर्व सदस्यांना पुढील निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. सध्याचे सर्व सदस्य पुन्हा निवडून यावेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्याचवेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हायला हवेत, असे त्यांनी म्हटले. विरोधी बाकांवर बसलेल्या एका मोठ्या नेत्यानी थेट नरेंद्र मोदींचे कौतुक करून ते पुन्हा पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केल्यामुळे विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना आश्चर्य वाटले. सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी मुलायम सिंह यादव यांच्या वक्तव्याचे स्वागत केले आहे.