Lal Krishna Advani Wish About Disputed Construction In Ayodhya: अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. यासाठीही सर्व तयारी अगदी उत्साहामध्ये सुरु आहे. असं असतानाच आता राम मंदिरासंदर्भातील वेगवेगळ्या गोष्टी चर्चेत असतानाच अयोध्येतील रामजन्मभूमी वादाचा न्यायालयात लागलेला निकालही चर्चेत आहे. याचसंदर्भात आता भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी एक जुनी आठवण नुकतीच एका मुलाखतीत सांगितली आहे. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लाल कृष्ण अडवाणी यांच्यासंदर्भात एक मोठा दावा उमा भारतींनी केला आहे.


6 जणांना अटक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

6 डिसेंबर 1992 साली अयोध्येतील वादग्रस्त बांधकाम कारसेवकांनी पाडल्यानंतर नेमकं काय काय घडलं यासंदर्भातील माहिती उमा भारती यांनी एका मुलाखतीत दिली. यावेळेस बोलताना त्यांनी 6 तारखेला वादग्रस्त बांधकाम पाडल्यानंतर 2 दिवसांनीच आपल्याबरोबरच लाल कृष्ण अडवाणी, अशोक सिंघल, मुरली मनोहन जोशी, विष्णुहरी डालमिया, विनय कटियांना अटक करण्यात आली होती, असं सांगितलं.  या सर्वांना आग्रा येथील तुरुंगामध्ये नेण्यात आलं होतं असंही उमा भारती म्हणाल्या. अडवाणींचा उल्लेख झाल्याने उमा भारतींनी अडवाणींबद्दल एक धक्कादायक खुलासा केला.


याचा कदाचित खेद वाटला


अनेक वर्षांपासून अडवाणींबरोबर काम केलेल्या उमा भारती यांनी पुढे बोलताना अडवाणी यांचा विचार वादग्रस्त बांधकाम पाडण्याचा नव्हता असं म्हटलं आहे. "आता हे ऐकायला विचित्र वाटलं असलं तरी असं नक्कीच नाहीय पण जेव्हा अडवाणी सोमनाथवरुन रथ यात्रा घेऊन निघाले होते तेव्हा त्यांची मागणी वादग्रस्त बांधकाम न पाडता ते नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने इतर जागी हालवण्याची होती. मात्र या उलट त्यांच्या डोळ्यांसमोरच सर्व घटनाक्रम घडला ज्यामध्ये कारसेवकांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता हे बांधकाम पाडलं. अडवाणी यांना कदाचित याच गोष्टीचा खेद वाटला असावा. रामलल्ला ज्या ठिकाणी विराजमान होते तिथेच मंदिर बनवण्याची त्यांची इच्छा होती," असंही उमा भारती म्हणाल्या आहेत. 


नक्की वाचा >> 'मी इथं शहीद झालो तर राम मंदिराचा..'; बाबरी पतनानंतर अडवाणींनी उमा भारतींना स्पष्टच सांगितलेलं


ती घटना कारण ठरली


"तेव्हा अयोध्येमध्ये जी गर्दी जमा झाली होती ते रामभक्त कारसेवक होते. मात्र त्यापैकी बरेचसे लोक हे शिस्तबद्ध कार्यकर्ते नव्हते. काहीही झालं तरी हे वादग्रस्त बांधकाम पाडायचं एवढाच त्यांचा हेतू होता. हे बांधकाम पाडल्यानेच पुरातत्व विभागाला खोदकाम करता आलं. त्यामध्येच इथं पूर्वी मंदिर होतं याचे पुरावे मिळाले. ही बाब कोर्टानेही स्वीकारली. 6 डिसेंबरीची घटना राम मंदिर उभारण्यासाठी मूळ कारण ठरली. तसेच यामधून एक धडाही मिळाला की लोकांच्या भावना या रिमोट कंट्रोल नियंत्रणात ठेवता येत नाहीत," असंही 6 डिसेंबरच्या घडामोडींबद्दलच्या आठवणी जागवताना उमा भारती म्हणाल्या.