निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : मुंबईतल्या मिंट स्ट्रिटवर, दलाल स्ट्रीटवरच्या (Dalal street) कार्यालयामधून आज दुपारच्या जेवणासाठी लोक बाहेर येतील तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हसू असेल की चिंतेचे भाव हे सकाळी 10 वाजता  ठरणार आहे. (RBI monetary policy).


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिझर्व्ह बँकेचा (RBI) द्वैमासिक पतधोरण आढावा आज गव्हर्नर शक्तीकांता दास जाहीर करणार आहेत. या आढाव्यात व्याजदर (Interest Rate) पुन्हा एकदा जैसे थे राहतील असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. व्याजदर वाढीच्या सत्राला ब्रेक लागून आता जवळपास वर्ष पूर्ण होत आलं आहे. महागाईचा दरही (Inflation) रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या मर्यादेत आला आहे. कच्च्या तेलाचे भाव आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर या अर्थव्यवस्थेसाठी महत्वाच्या गोष्टीसुद्धा सध्याच्या परिस्थितीत देशासाठी अत्यंत अनुकूल पातळीवर आहेत. 


परिणामी आता व्याजाचे दर कमी करण्यासाठी साजेशी स्थिती बनत चालली आहे . या पार्श्वभूमीवर गव्हर्नर आज भविष्यातील व्याजदर कपातीचे ढोबळ वेळापत्रक देतात काय याकडे सर्वांचं लक्ष असणारे आहे. जर अशी किंवा तत्सम कोणतीही घोषणा रिझर्व्ह बँकेनं केली तर दररोज नवी शिखरं ओलांडाणारा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक Nifty 21 हजाराच्या पलिकडे तर दोन दिवसांपूर्वी 70 हजाराच्या उंबरठयावरुन माघारी आलेला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स Sensex) 70 हजाराची पातळी ओलांडेल असा बाजार तज्ज्ञांचा होरा आहे. 


हेसुद्धा वाचा : 'अरे बापरे! सिंचन घोटाळा फेम अजित पवारांना..'; फडणवीसांचं पत्र वाचून संजय राऊतांचा टोला


 


दुसरीकडे जर रिझर्व्ह बँकेने पतधोरण सैल करण्याचा निर्णय घ्यायला आणखी काही काळ वाट बघावी लागेल असे भाष्य केलं तर मात्र बाजाराच्या चढाईला तूर्तास ब्रेक लागण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय गेल्या काही वेगाने वाढणारे बँकिंग आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील समभागांच्या किंमती वेगाने खाली घसरतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आज छोट्या गुंतवणूकदारांनी बाजारच्या दिशा स्पष्ट झाल्यानंतरच गुंतवणूकीचा विचार करणे श्रेयस्कर ठरणार आहे.