'अरे बापरे! सिंचन घोटाळा फेम अजित पवारांना..'; फडणवीसांचं पत्र वाचून संजय राऊतांचा टोला

Fadnavis Letter To Ajit Pawar Sanjay Raut Reacts: नवाब मलिक हे हिवाळी अधिवेशनामध्ये अजित पवार गटासोबत असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर फडणवीस यांनी आपला आक्षेप पत्रातून नोंदवला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 8, 2023, 06:47 AM IST
'अरे बापरे! सिंचन घोटाळा फेम अजित पवारांना..'; फडणवीसांचं पत्र वाचून संजय राऊतांचा टोला title=
राऊत यांनी नोंदवली पहिली प्रतिक्रिया

Fadnavis Letter To Ajit Pawar Sanjay Raut Reacts: महाराष्ट्रातील राजकारणामध्ये गुरुवारी एक नवीन लेटर बॉम्बने खळबळ उडाली आहे. जामीनावर बाहेर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी अजित पवार गटामध्ये सहभागी होण्याची भूमिका हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपल्या कृतीतून स्पष्ट केली. नवाब मलिक हे अजित पवार गटाचे सदस्य बसलेल्या सत्ताधारी आमदारांच्या बाकड्यावर जाऊन बसले. मात्र नवाब मलिक यांना महायुतीमध्ये घेण्यास भारतीय जनता पार्टीचा स्पष्ट विरोध असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लहून कळवलं आहे. हे पत्र फडणवीस यांनी एक्सवरुन (ट्वीटरवरुन) पोस्ट केलं आहे. या पत्रामुळे अजित पवार नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असतानाच आता उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.

नक्की घडलं काय?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यापासूनच जेलमधून बाहेर आलेले नवाब मलिक नेमक्या कोणत्या बाजूला आपला पाठिंबा देणार याची चर्चा होती. दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने या चर्चांना पूर्णविराम मिळाला. नवाब मलिक अधिवेशनसाठी दाखल झाले असता सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले. यामुळे त्यांचा अजित पवार गटाला पाठिंबा असल्याचं स्पष्ट झालं. मात्र यामुळे एक चर्चा बंद झाली असली तरी नवा वाद निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिकांना महायुतीत सहभागी करुन घेण्यावर नाराजी जाहीर केली आहे.

फडणवीसांच्या पत्रात काय?

नवाब मलिकांवर ज्या पद्धतीचे आरोप आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही, असं आमचं मत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना स्पष्टच सांगितलं आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. सत्ता येते-जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा असल्याचंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

संजय राऊतांचा टोला...

"अरे बापरे! सत्तेपेक्षा देश महत्वाचा अशी एकदम नवी माहिती देवेंद्रजी यांनी दिली. महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला हे माहीतच नव्हते. त्यांच्या देशात हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल, सिंचन घोटाळा फेम अजित पवार, ED फेम भावना गवळी, सरनाईक, मुलुंडचे नागडे पोपटलाल यांना मानाचे स्थान आहे. यांचा देश हा असा आहे. हल्ला फक्त मलिक यांच्यावर बाकीचे यांच्या मांडीवर," असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीस यांच्या पत्राच्या पोस्टवर रिप्लाय दिला आहे. तसेच या रिप्लायचा शेवट, "पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची" असं म्हणत केला आहे.

अजित पवार नाराज?

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या या स्फोटक पत्रामुळे अजित पवार नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार गुरुवारी कोणत्याही कार्यक्रमाला त्यांच्या बंगल्याबाहेर पडणार नसल्याची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडवणीस यांच्या पत्रानंतर अजित पवार नाराज असल्यानेच ते घराबाहेर पडणार नसल्याची चर्चा नागपूरच्या राजकीय वर्तुळात काल सायंकाळपासून रंगली.