नवी दिल्ली: संपत्तीनिर्मिती करणाऱ्या व्यक्तींचा नागरिकांनी आदर झाला पाहिजे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील उद्योजकांची पाठराखण केली आहे. त्यांनी गुरुवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना संबोधित केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी मोदींनी आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्थेला ५ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा कसा गाठता येईल, यासंदर्भात सविस्तर भाष्य केले. तेव्हा मोदींनी देशातील उद्योजकांची पाठराखण केली. त्यांनी म्हटले की, देशात संपत्तीनिर्मिती करणाऱ्यांचा उचित आदर झाला पाहिजे. कारण, संपत्तीनिर्मिती झालीच नाही तर संपत्तीचे वाटपही होणार नाही, याकडे नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न मोदींनी केला. त्यामुळे संपत्ती निर्मिती करणारे या देशाची संपत्ती असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले.


तसेच पाच ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टाविषयी बोलताना मोदींनी म्हटले की, मोठी स्वप्ने पाहायलाच पाहिजेत, तरच विकास होऊ शकतो. देशातील लहानसहान घटकांनी आपापली जबाबदारी पार पाडली, तर पाच ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट शक्य आहे. 


अर्थव्यवस्थेचा विकास झाला तर देशातील प्रत्येक घटकाच्या विकासाच्या संधी निर्माण होतात. सध्याच्या घडीला भारतामध्ये राजकीय स्थैर्य असल्यामुळे जग आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे. त्यामुळे सध्या देशात आर्थिक वृद्धीसाठी अत्यंत अनुकूल वातावरण आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये आमच्या सरकारने देशाचा विकासही केला आणि महागाईही आटोक्यात ठेवली, असा दावाही मोदींनी यावेळी केला.