आता संपूर्ण देशच काश्मीर झालाय; यशवंत सिन्हांची भाजपवर टीका
काश्मीरची परिस्थिती सामान्य करणे सोडाच पण आता सर्व उलटे होऊन बसले आहे.
नवी दिल्ली: केंद्र सरकारने काश्मीरमधील परिस्थिती देशातील इतर भागांप्रमाणे सामान्य करू असे म्हटले होते. मात्र, देशातील सध्याची परिस्थिती पाहता संपूर्ण देशच काश्मीर झालाय, अशी टीका भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांनी केली. ते मंगळवारी दिल्लीच्या जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठाबाहेर बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेण्यासाठी अनुच्छेद ३७० आणि ३५ ए रद्द केले. हे विरोधी विचारांना दडपण्याचे धोरण आहे.
सध्या सत्तेत असलेल्या लोकांनी आम्ही काश्मीरची परिस्थिती देशाच्या इतर भागांप्रमाणे सामान्य करू, असा दावा केला होता. मात्र, सध्याची परिस्थिती नेमकी उलट आहे. देशातील इतर भागांमधील परिस्थिती काश्मीरसारखी झाली आहे, असे यशवंत सिन्हा यांनी म्हटले.
जेएनयू हिंसाचार : हिंदू रक्षा दलाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली
यासाठी यशवंत सिन्हा यांनी काश्मीरमधील शोपिया, बारामुला आणि पुलवामाचे उदाहरण दिले. तुम्ही याठिकाणी गेलात तर तुम्हाला मोठ्याप्रमाणात लष्करी बंदोबस्त दिसून येईल. परंतु, सध्या दिल्लीतही नेमकी हीच परिस्थिती आहे, याकडे सिन्हा यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
यावेळी यशवंत सिन्हा यांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) हिंसाचाराविषयीही भाष्य केले. त्यांनी म्हटले की, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दडपशाहीचे धोरण दिसून येईल. यापूर्वी दडपशाहीसाठी पोलिसांचा वापर व्हायचा, आता गुंडांचा वापर होत आहे. पोलीस निष्पापांना मदत करायची सोडून गुंडांना मदत करत आहेत. यामुळे देशात विचित्र परिस्थिती निर्माण झाल्याचे यशवंत सिन्हा यांनी सांगितले.