'आमच्याकाळी जेएनयू विद्यापीठात तुकडे-तुकडे गँग नव्हती'

सध्या दिल्लीसह देशातील राजकारण प्रचंड तापले आहे. 

Updated: Jan 6, 2020, 11:06 PM IST
 'आमच्याकाळी जेएनयू विद्यापीठात तुकडे-तुकडे गँग नव्हती' title=

 नवी दिल्ली: मी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) शिकायला होतो तेव्हा आम्ही कोणतीही तुकडे-तुकडे गँग पाहिली नव्हती, असे वक्तव्य परराष्ट्रमंत्री आणि 'जेएनयू' विद्यापीठाचे माजी विद्यार्थी एस. जयशंकर यांनी केले. ते सोमवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांना 'जेएनयू'त रविवारी विद्यार्थी आणि शिक्षकांवर झालेल्या हल्ल्याविषयी विचारण्यात आली. यावेळी एस. जयशंकर यांनी म्हटले की, मी या विषयावर अगोदर भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, आमच्याकाळी जेएनयू विद्यापीठात तुकडे-तुकडे गँग नव्हती, हे मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो, असे एस. जयशंकर यांनी म्हटले. 

उद्धवजी तुमच्या नाकाखाली स्वतंत्र काश्मीरचे फलक झळकावले जातायंत- फडणवीस
 
दिल्लीतील जेएनयू कॅम्पसमध्ये काल रविवारी संध्याकाळी विद्यार्थ्यांवर चेहरे झाकलेल्या काही व्यक्तींनी हल्ला केला. यात अनेक विद्यार्थी आणि शिक्षकही जखमी झाले होते. एस. जयशंकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, मी या घटनेचा निषेध करतो. हे 'जेएनयू'च्या परंपरा आणि संस्कृतीला साजेसे नाही. या घटनेचे पडसाद आज देशभरात उमटले. मुंबईसह महाराष्ट्रात काही ठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ आंदोलने करण्यात आली.

या हल्ल्यामागे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभविप) हात असल्याचा आरोप जेएनयूतील विद्यार्थी संघटनेने केला होता. मात्र, 'अभविप'ने हा आरोप फेटाळून लावत या सगळ्यासाठी डाव्या विचारसरणीच्या संघटनाच जबाबदार असल्याचे म्हटले होते. यामुळे सध्या दिल्लीसह देशातील राजकारण प्रचंड तापले आहे.