जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : भाजपच्या या यशाचा आम्हाला आंनद आहे परंतु लोकशाहीत सामान दर्जाचे दोन पक्ष आवश्यक असतात. भाजप सत्तेत आहे तर काँग्रेस हा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून निवडून यायला हवा होता असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते व ज्येष्ठ विचारक मा.गो वैद्य यांनी व्यक्त केलं. काँग्रेसने घराणेशाहीवर अवलंबून न राहता संघटनेची जास्त काळजी घेतली पाहिजे आणि याकरिता तरुण नेतृत्वाने समोर येऊन पक्ष संघटन मजबूत केलं पाहिजे असेही मा.गो वैद्य यांनी सुचवले. अयोध्येत राम मंदिराबाबतचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाने हा मुद्दा बाजूला ठेवला तर सरकारने याबाबत कायदा करून राम मंदिराचे निर्माण करावे असे मा गो वैद्य म्हणाले. राम मंदिर हा राजकारणाचा विषय नसून हा श्रद्धेचा व भावनेचा विषय आहे. सरकारच्या या पाच वर्षाच्या कार्यकाळात योग्य निर्णय घेईल. सोबतच कलाम ३७० ठेवायचे की नाही हा वादाचा मुद्दा राहू शकतो त्यामुळे सुरुवातीला काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन आणि जम्मू काश्मीर विधानसभेचा कार्यकाळ हा इतर राज्याप्रमाणे ५ वर्षांचा करणे हे अगोदर केंद्र सरकारने केले पाहिजे असेही मा.गो वैद्य यांनी सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या विजयाचा आम्हाला आनंद आहे. संघाच्या स्वयंसेवकांनी अमक्याला मतं द्या असं म्हटलं नाही परंतु मतदानाचा आग्रह केला. त्याप्रमाणे लोक मतदानाला गेले तरीही नागपुरात कमी मतदान झाल..ते कमी का झालं याचा शोध घ्यावा लागेल असे ते म्हणाले. २०१४ आणि आताही कॉंग्रेस हा प्रबळ विरोधी पक्ष नाही. विरोधी पक्षाला हवे असणाऱ्या १० टक्के जागा काँग्रेसला मिळायला पाहिजे होत्या. यासाठी कॉंग्रेसने आपल्या संघटनेची जास्त काळजी घेतली पाहिजे. घराणेशाहीवर अवलंबून न राहता खालच्या स्तरातून संघटना बांधली पाहिजे. काँग्रेसमधीलच सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे, मिलिंद देवरा अशा तरुण लोकांनी एकत्र येऊन कॉंग्रेस पक्ष वाचवण्यासाठी आणि सुदृढ करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. असे प्रयत्न पुढचे ८-१० वर्षे केल्यास कॉंग्रेस पक्ष कमीत कमी एक मोठा विरोधी पक्ष बनेल. राहुल गांधींचे नेतृत्व प्रचारापुरते ठीक आहे मात्र पक्ष संघटन बाबतीत ते अनुभवी नाही त्यामुळे ते यशस्वी होणार नाही असेही वैद्य यांना वाटते. 



भाजपा सरकारने केलेल्या कामांमुळे त्यांना यश मिळालं. स्वच्छ भारत, जीएसटी, नोटबंदी याचा सुरवातीला त्रास झाला मात्र नंतर लोकांनी त्याला योग्य प्रतिसाद दिला. काळा पैसा वाया गेला. काळ्या पैश्याच्या जोरावर बाहेरून आतंकवादाला होणारा पैशाचा पुरवठा कमी झाला. सरकारने जे काम केलं आहे ते प्रशंसनीय आहे. सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचार थांबला आहे. मोदींवर कोणी भ्रष्टाचाराचे आरोप केले नाही. प्रत्येक गावत वीज आली आहे.


आरएसएसचा प्रवक्ता असताना २००२ मध्ये काश्मिरी पंडितांनी भेटून सांगितले होते कि ते त्यांच्या मूळ गावी जाऊ शकणार नाहीत. त्यामुळे त्यांची एक स्वतंत्र वसाहत असावी आणि या वसाहतींना केंद्र शासित राज्याचा दर्जा असावा असे वैद्य यांनी सुचविले. काश्मीर सर्वांच्या बरोबर आणले पाहिजे. त्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ इतर राज्यांप्रमाणे ५ वर्षांवर आणला पाहिजे. कलम ३७० चे ३५ (अ) कलम संसदेन मान्य केलं नाही ते राष्ट्रपतींच्या मान्यतेने पारित झालं  आहे. राष्ट्रपतींच्या आदेशाने ते नाहीसे देखील होऊ शकतो.. ज्या संबंधाने काही वाद होणार नाही असे काश्मिरी पंडितांच पुनर्वसन आणि काश्मीरच्या विधानसभेच मुदत ५ वर्षे करणे हे अगोदर केलं पाहिजे. या संपूर्ण निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेविषयी संघाचा पदाधिकारी नसल्याने मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही,याच उत्तर संघाचे पदाधिकारी देऊ शकतात असेही ते म्हणाले.