नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीतील देदिप्यमान विजयानंतर गुरुवारी संध्याकाळी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील ( रालोआ) खासदारही मंत्रिपदाची शपथ घेतील. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद मोदींना पंतप्रधानपदाच्या पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. तर भाजपचे खासदार संतोष गंगवार यांच्याकडे लोकसभेचे हंगामी अध्यक्षपद देण्यात येणार आहे. त्यामुळे ते नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संतोष गंगवार यांनी आठव्यांदा लोकसभेवर निवडून येण्याची कामगिरी करून दाखवली आहे. यापूर्वीच्या सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. लोकसभा निवडणुकीनंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड होईपर्यंत हंगामी अध्यक्ष संसदेचा सर्व कारभार सांभाळतात. सूत्रांच्या माहितीनुसार गंगवार यांनाच लोकसभेची कायमस्वरुपी अध्यक्षपद मिळू शकते. तसे झाल्यास सरकारला आणखी एका हंगामी लोकसभा अध्यक्षाची निवड करावी लागेल.


MTNL चा अभियंता ते केंद्रीय मंत्री, जाणून घ्या अरविंद सावंत यांचा प्रवास


दरम्यान, मंत्र्यांच्या शपथविधीनंतर कृषी, ग्रामीण विकास, ऊर्जा, गृहनिर्माण ही महत्त्वाची खाती कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर एनडीएतील घटकपक्षांच्या प्रत्येकी एका खासदाराला मंत्रिपद देण्यात येईल. यापैकी शिवसेनेकडून मंत्रिपदासाठी अरविंद सावंत यांचे नाव निश्चित झाले आहे. तर महाराष्ट्रातून आणखी कोणत्या नव्या चेहऱ्यांना भाजपकडून संधी दिली जाणार, हे पाहणेही औत्स्युकाचे ठरेल. 


मात्र, अगदी शेवटच्या क्षणी यामध्ये बदल झाल्यास शिवसेना आणि जदयूला प्रत्येकी दोन, तर अकाली दल, लोक जनशक्ती पक्ष आणि अण्णाद्रमुकच्या वाट्याला प्रत्येकी एक मंत्रिपद येऊ शकते.