Online Fraud: कोड टाकताच रिकामं होणार खातं, SBI कडून ग्राहकांना इशारा
ऑनलाइन फसवणुकीपासून सुरक्षित कसे राहायचे याबद्दल बँका ग्राहकांना सतत माहिती देत असतात.
मुंबई : कोरोना महामारीनंतर ऑनलाइन पेमेंटचा ट्रेंड खूप वाढला आहे. लोक छोट्या व्यवहारांपासून ते अगदी मोठ्या व्यवहारांपर्यंत सगळंच काम ऑनलाईन मार्गाने करु लागले आहे. परंतु यामुळे ऑनलाईन फसवणूकीच्या घटना वाढल्या आहेत. ज्यामुळे कोणत्याही ग्राहकांनी ऑनलाईन पेमेंट करताना काळजी घेणं महत्वाचं आहे.
ऑनलाइन करताना सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे UPI पिन. ज्यामुळे तुमचं अकाउंट आणि पैसे सेफ राहतात. तसेच या एका पिनमुळे तुमचं बँक खाते रिकामी होऊ शकतं.
ऑनलाइन फसवणुकीपासून सुरक्षित कसे राहायचे याबद्दल बँका ग्राहकांना सतत माहिती देत असतात. अलीकडेच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांना UPI पिनच्या योग्य वापराविषयी सांगितले आहे. ऑनलाइन पेमेंट करताना लोकांना फक्त UPI पिन टाकावा लागेल, असे एसबीआयने म्हटले आहे. तसेच, बँकेने काही टिप्स उघड केल्या आहेत ज्याचा वापर ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही करु शकता.
UPI म्हणजे काय?
UPI म्हणजे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या मते, ही एक रिअल टाइम पेमेंट सिस्टम आहे जी एकाच मोबाइल प्लॅटफॉर्मद्वारे दोन बँक खात्यांमध्ये निधी हस्तांतरण सुलभ करते. या फीचरच्या मदतीने तुमचा स्मार्टफोन व्हर्च्युअल डेबिट कार्ड म्हणून वापरता येईल. तुम्ही UPI च्या मदतीने पैसे मिळवू आणि पाठवू शकता. पैसे पाठवण्यासाठी तुम्हाला UPI पिन टाकावा लागेल.
UPI पिनद्वारे फसवणूक टाळण्यासाठी टिप
1. UPI पिन फक्त पैसे पाठवण्यासाठी आवश्यक आहे पैसे मिळवण्यासाठी नाही.
2. पैसे पाठवण्यापूर्वी नेहमी मोबाइल नंबर, नाव आणि UPI आयडी चेक करा.
3. तुमचा UPI पिन कोणाशीही शेअर करू नका
4. निधी पाठवण्यासाठी स्कॅनर वापरून पहा
5. कोणत्याही उपायासाठी अधिकृत वेबसाइट वापरा.
6. कोणत्याही पेमेंट किंवा तांत्रिक समस्यांसाठी, अॅपच्या मदत विभागाचा वापर करा किंवा बँकेच्या तक्रार पोर्टलला भेट द्या.