एसबीआयचे `हे` डेबिट कार्ड बंद होणार
३१ डिसेंबर २०१८ ला हे कार्ड कायमस्वरुपी बंद होणार असल्याची माहिती एसबीआयच्या ऑफिशियल ट्विटरवर देण्यात आली आहे.
मुंबई : जर तुमचे बँक खाते स्टेट बॅंकेत आहे, तर ही तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण बातमी आहे. एसबीआयच्या खातेधारकांच्या एटीएम कार्डसंदर्भातील ही बातमी आहे. स्टेट बँक खातेधारकांचे जुने डेबिट कार्ड बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपल्या ग्राहकांना चांगली सेवा देता यावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. बँकेने जुने एटीएम कार्ड (डेबिट कार्ड) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही जुनी कार्डे मेजिस्ट्रिप मॅग्नेटिक डेबिट कार्ड आहेत. या कार्डात बदल करुन अत्याधुनिक इएमवी कार्ड देण्यात येणार आहेत. बँकेने आपल्या खातेधारकांना ३१ डिसेंबरपर्यंत कार्ड बदलण्यासाठी मुदत दिली आहे.
पैशांची चणचण भासणार
एटीएम आल्यापासून आपण बँकेत न जाता, थेट आपल्या गरजेनुसार एटीएममधून पैसे काढतो. पैशांची चणचण भासू नये म्हणून तुम्हाला एक काम करावे लागणार आहे. तुमच्याकडे असलेलं डेबिट कार्ड हे मॅग्नेटिक असेल तर ते बदलून ईएमवी चिप असलेले डेबिट कार्ड घ्यावे लागणार आहे. गैरसोय टाळण्यासाठी जास्त वेळ न दवडता डेबिट कार्ड बदलून घ्या. जुने एटीएम कार्ड हे ३१ डिसेंबरपर्यंतच चालणार आहे. यानंतर हे कार्ड एटीएम मशीनद्वारे स्वीकारले जाणार नाहीत.
हे करा
जुने डेबिट कार्ड बदलून एव्हीएम चिप असलेले डेबिट कार्ड सेवेत आणली जात आहेत. नवी कार्डे तुम्ही ऑनलाईन आणि नजीकच्या एसबीआय बँकेच्या शाखेत जाऊन बदलून घेऊ शकता. बँकेने हे कार्ड फेब्रुवारी २०१७ पासून बंद करायला घेतले आहेत. ३१ डिसेंबर २०१८ ला हे कार्ड कायमस्वरुपी बंद होणार असल्याची माहिती एसबीआयच्या ऑफिशियल ट्विटरवर देण्यात आली आहे.
म्हणून बंद केली जात आहेत कार्डे
जु्न्या एटीएम आणि डेबिट कार्डच्या मागील बाजूवर एक काळी पट्टी आहे. ती मॅग्नेटिक स्ट्रीप आहे. ज्यात खातेधारकाची गोपनीय माहिती असते. एटीएम मशीनमध्ये कार्ड स्वाइप केल्यानंतर पैसै निघतात. शॉपिंग दरम्यान याच कार्डाचा वापर केला जातो.
मॅग्नेटिक स्ट्रीप काळाच्या पडद्याआड
आता जे एटीएम कार्ड वापरात आहेत, ते जुन्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे कार्ड पूर्णपणे सुरक्षित नाही. या कार्डाच्या सुरक्षिततेच्या शंकेमुळे हे कार्ड बंद केले जाणार आहे. तर नव्या तंत्रज्ञानावर आधारित असलेले इएमव्ही चिप कार्ड तयार केले आहेत. हे कार्ड पूर्णपणे सुरक्षित आहेत.
चिप असलेले कार्ड सुरक्षित
चिप असलेले कार्ड वापरण्यास सुरक्षित आहे. या कार्डमधून खातेधारकाची गोपनीय माहिती गहाळ होण्याच्या शंकेला वाव नसतो. याची कॉपी करता येत नाही. चिप असलेल्या कार्डमधून व्यवहार करण्यासाठी एक कोड तयार केला जातो. यामुळे हे कार्ड वापरण्यास सुरक्षित आहे. मॅग्नेटिक स्ट्रिप असलेल्या कार्डची माहिती चोरी करणे सोपे असते. या माहितीचा वापर करुन बनावट कार्ड तयार करणे सोपे असते. यामुळेच आरबीआय अशा प्रकारचे कार्ड बंद करुन खातेधारकांचे पैसे सुरक्षित ठेवत आहेत.
आरबीआयचे आदेश
रिझर्व्ह बँकेने २०१६ साली बँकांना मॅग्नेटिक स्ट्रीप असलेले कार्ड बंद करुन नवे कार्ड सुरु करण्यासंदर्भात आदेश दिले होते.
विनाशुल्क सेवा
मॅग्नेटिक स्ट्रीप असलेले कार्ड एसबीआय बंद करत असून, ते बदलून घेण्याची सूचना खातेधारकांना केली आहे. ही सेवा ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाहीत. बँकेने आपल्या वेबसाईटवर याबाबत माहिती दिली आहे. https://bank.sbi/portal/web/personal-banking/magstripe-debit-cardholders