नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. यानंतर पवारांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी शरद पवार यांच्या चेहऱ्यावर हलकंस हास्य होतं. तरी सर्वच काही पत्रकारांना सांगायचं नाही, ही पवारांची 'हाताची घडी' सांगत होती. आमच्याकडे सत्ता स्थापन करण्यासाठी आकडे नाहीत, भाजप-शिवसेनेकडे आहेत, असे उत्तराचे 'बाण' आपल्याहाती 'धनुष्य' आल्यासारखे पवार पत्रकारांच्या उत्तराला मारत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप-शिवसेनाविषयी आपण काहीही सांगू शकत नाहीत, असं म्हणताना, 'सर्वच पत्ते आता काही उघड करायचे नाहीत', अशी पवारांची देहबोली सांगत होती.


शिवसेनेसोबत जावून राष्ट्रवादी राज्यात सत्ता स्थापन करणार का? या प्रश्नाला पवार 'यॉर्कर' टाकत उत्तर देत होते. अगदी लग्नात वऱ्हाडी सांगतात, त्याप्रमाणे पवार सांगत होते, सत्ता स्थापनेसाठी आम्हाला कुणीही विचारत नाहीय, तर सांगणार कसं आणि आमच्याकडे आकडेही नाहीत.


एकंदरीत पवार राज्यातील नेत्यांशी पुन्हा एकदा चर्चा करून सेमी फायनल खेळणार असल्याचं दिसतंय, यानंतर फायनल सामना कधी खेळायचा याचं टायमिंग शरद पवार साधत असल्याचं चित्र आहे.



तसेच दिल्लीत शरद पवारांनी काँग्रेस नेतृत्वाला राज्यातील ग्रास रूटची देखील माहिती दिल्याचं स्पष्ट होत आहे. सरकारविषयी लोकांमध्ये नाराजीचं वातावरण असल्याचं माहिती देखील यावेळी शरद पवारांनी सोनिया गांधी यांना दिली आहे.