रांची: महाराष्ट्रातील शिवसेना आणि काँग्रेसची युती फार काळ टिकणार नाही. आगामी काही दिवसांमध्ये शिवसेनेला काँग्रेससोबत जाण्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गडकरी यांनी हे भाष्य केले. त्यांनी म्हटले की, निवडणुकीपूर्वी एका पक्षाशी युती करायची आणि नंतर दुसऱ्या पक्षासोबत जायचे, ही गोष्ट सैद्धांतिकदृष्ट्या योग्य नाही. लोकशाहीसाठीही हे बरोबर नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधात मते मागितली होती. त्यामुळे जनतेने शिवसेना आणि भाजप या दोघांना मत दिले होते. तरीही केवळ मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने भाजपची साथ सोडणे, हे जनतेला रुचणार नाही. तसेच शिवसेना कायम बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या हिंदुत्वाचा दाखला देत असते ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मान्य नाही. त्यामुळे शिवसेना-काँग्रेसच्या युतीला सैद्धांतिक आधार नाही, ही संधीसाधू युती आहे. हा महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात आहे, अशी टीका गडकरी यांनी केली. तसेच जनतेने निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला नाकारले होते. तरीही शिवसेनेने या दोन्ही पक्षांशी युती केली. शिवसेनेला याची किंमत मोजावीच लागेल, असा इशारा गडकरी यांनी दिला. 


यावेळी गडकरी यांनी झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली भाजपने आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात चांगली राजवट झारखंडमध्येच दिली आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुकीत मोठा फरक आहे. तिथले पक्ष वेगळे आहेत. अजेंडा वेगळा आहे. निवडणुकीतील मुद्देही वेगळे आहेत. येथील जनतेला विकास हवा आहे. त्यामुळे रघुवर दास यांच्या नेतृत्वाखाली भाजपला नक्की विजय मिळेल, असेही गडकरी यांनी सांगितले.