सीवन के इस्त्रोचे नवे चेअरमन
केंद्रीय नियुक्ती समितीने सीवन यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केलं आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय नियुक्ती समितीने सीवन यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केलं आहे.
सीवन के नवे चेअरमन
भारताचा मानबिंदू असलेल्या इस्त्रोच्या चेअरमनपदावर ख्यातनाम शास्त्रज्ञ सीवन के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते विद्यमान चेअरमन ए एस किरण कुमार यांच्याकडून पदभार स्वीकारतील. 100 व्या उपग्रहाच्या ऐतिहासिक घटनेच्या दोनच दिवस आधी ही घोषणा करण्यात आली आहे.
समितीने केली घोषणा
नियुक्ती समितीने दिलेल्या नियुक्ती पत्रानुसार सीवन यांची अंतराळ विभागाचे सचिव आणि इस्त्रोचे चेअरमन या पदावर तीन वर्षांसाठी नियुक्ती केली आहे. सीवन के सध्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक आहेत.
एरोनॉटिकल इंजिनियर
सीवन यांनी 1980 साली मद्रास येथून एरोनॉटिकल इंजिनियरींगची पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी बंगळूर इथं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. 2006 मध्ये त्यांनी आयआयटी मुंबई येथून एरोस्पेस इंजिनियरींग या विषयात पीएचडी पूर्ण केली.
पीएसएलवीतलं योगदान
सीवन हे 1982 सालापासूनच इस्त्रोमध्ये कार्यरत आहेत. पीएसएलवी या इस्त्रोच्या उपग्रह प्रक्षेपकाच्या प्रकल्पात त्यांचं योगदान महत्वाचं आहे. यात मिशनचं नियोजन, डिझाईन, जोडणी आणि विश्लेषण अशा महत्वाच्या बाबींचा समावेश आहे. त्यांनी इस्त्रोमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. याशिवाय त्यांना अनेक पुरस्कारांनीसुद्दा सन्मानीत करण्यात आलं आहे.