तालिबानी कृत्याची भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी तुलना! खासदारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्तांकडूनही तालिबानची प्रशंसा, देशभरातून संतप्त प्रतिक्रिया
नवी दिल्ली : अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तिथे अफरा-तफर माजली आहे. रस्त्यांपासून विमानतळापर्यंत अराजकतेचं वातावरण आहे. अफगाण नागरिकांचं जीवन एका रात्रीत बदललं आहे. आतापर्यंत अनेकांचे जीव गेले आहेत? तालिबान्यांच्या दहशतीने अनेक नागरिक देश सोडून पळून जात आहेत. तालिबानच्या कृत्याचा जगभरातील अनेक देश निषेध करत असताना काही जण तालिबानच्या कृत्याचं समर्थन करताना दिसत आहेत.
लोकसभेतील एका खासदाराने तालिबानच्या या कृत्याचं कौतुक केलं आहे. तर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या (AIMPLB) प्रवक्तांनीही तालिबानाची प्रशंसा केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता त्यांच्यावर टीकाही होत आहे.
युपीच्या खासदाराने उधळली मुक्ताफळं
उत्तर प्रदेशच्या संभल मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे लोकसभेतील ज्येष्ठ खासदार शफीकुर रेहमान बर्क आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. पण यावेळी त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. खासदार शफीकुर रेहमान बर्क यांनी तालिबान्यांच्या कृतीचं समर्थन करतानाच त्याची तुलना थेट भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी केली आहे. ते म्हणाले, 'जेव्हा भारत ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली होता आणि त्यांना हटवण्यासाठी आम्ही लढा दिला, त्याच प्रकारे तालिबाननेही त्यांचा देश मुक्त केला.' त्यांनी तालिबानचे कौतुक केलं आणि म्हणाले, "या संघटनेनं रशिया, अमेरिकेसारख्या शक्तिशाली देशांना त्यांच्या देशात स्थिरावू दिलं नाही. खासदार शफीकुर रेहमान बर्क यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर पोलिसांनी देशद्रोहाच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला.
AIMPLB प्रवक्तांकडून प्रशंसा
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी यांनीही तालिबानचं समर्थन केलं आहे. 'एका नि:शस्त्र समाजाने बलाढ्य शक्तींचा पराभव केला आहे. ते काबुलच्या राजवाड्यात शिरले, संपूर्ण जगाने हे पाहिलं. त्यांच्यात कोणताही गर्व किंवा अहंकार नव्हता. तालिबानी तरुण काबूलच्या मातीचं चुंबन घेत आहेत. अभिनंदन. दूरवर बसलेला हा हिंदी मुस्लिम तुम्हाला सलाम करतो. तुमच्या धाडसाला सलाम करतो', असं मौलाना सज्जाद नोमानी यांनी म्हटलं आहे.
वादग्रस्त व्यक्तव्यानंतर देशभर संताप
दरम्यान, खासदार शफीकुर रेहमान बर्क आणि मौलाना सज्जाद नोमानी यांच्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. खासदार शफीकुर रेहमान बर्क त्यांच्याविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 124 अ (देशद्रोह) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपाचे उत्तर प्रदेशमधील नेते राजश सिंघल यांनी शफीकुर रेहमान यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. तर यूपी सरकारमधले मंत्री मोहसिन रजा यांनीही हल्लाबोल केला आहे. अशी वक्तव्य करणाऱ्यांना 'देशातील तरुणांना इसिसच्या दिशेने नेण्याची इच्छा आहे. त्यांना तरुणांना दहशतीच्या आगीत फेकून द्यायचे आहे. ही लोकं तालिबानला त्यांचा आदर्श मानत आहेत, ते देशासाठी धोक्याचं आहे' असं मंत्री मोहसिन रजा यांनी म्हटलं आहे.