Education News : सहसा परीक्षा म्हटलं की, काही गोष्टी आपल्या नजरेसमोर आपोआपच येतात. एखादे शिस्तीचे शिक्षक, हालचालही केली तरी नजरेचा धाक देणारे पर्यवेक्षकस समोर असणारी प्रश्नपत्रिका आणि हाती आलेली कोरी करकरीत उत्तर पत्रिका असं साधारण परीक्षेचं स्वरुप. यामध्ये प्रश्नपत्रिका शैक्षणिक संस्थांच्या वतीनं किंवा शिक्षण मंडळाच्या वतीनं दिली जाते, सोबतच उत्तर पत्रिकाही विद्यार्थ्यांना दिली जाते. ज्यावर उत्तरं लिहून ही उत्तर पत्रिका त्यांनी सदर पर्यवेक्षक किंवा परीक्षागृहात असणाऱ्या शिक्षकांकडे देऊन परीक्षेच्या वेळेनंतर प्रश्नपत्रिका आपल्यासोबत नेणं अपेक्षित असतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता मात्र परीक्षेचं हे साचेबद्ध स्वरुप बदलणार आहे. कारण, शासनाच्या एका निर्णयामुळं आता चक्क विद्यार्थ्यांना त्यांच्या घरूनच उत्तर पत्रिका सोबत आणाव्या लागणार आहेत. कारण, शाळांकडून त्यांना फक्त प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे. कर्नाटक राज्य शासनानं घेतलेल्या या अजब निर्णयामुळं सध्या अनेकांनाच धक्का बसला आहे. कारण, या शासन निर्णयानुसार इयत्ता पाचवी, आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिका स्वत:च्या घरूनच आणावी लागणार आहे. 


नुकतंच कर्नाटक राज्य शासनाच्या वतीनं राज्यातील शाळांना यासंदर्भातील निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशांनुसार विद्यार्थ्यांना शाळांकडून फक्त प्रश्नपत्रिका पुरवण्यात येणार असून, उत्तर पत्रिका विद्यार्थ्यांनीच आणाव्यात अशा सूचना करण्याचं सांगण्यात आलं आहे. या उत्तर पत्रिकांची गुणपडताळणी ब्लॉक स्तरावर करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. 


हेसुद्धा वाचा : पुस्तक पाहून देता येणार 10 वी, 12 वीची परीक्षा; CBSE पाठोपाठ महाराष्ट्र बोर्डाचा उपक्रम


 
काय आहे या निर्णयामागचं कारण? 


कर्नाटक शासनानं हा निर्णय घेतला खरा, पण अद्यापही या निर्णयामागचं कारण मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाही. एका प्रतिष्ठीत वृत्तपत्रातील वृत्तानुसार 2022-23 मध्ये विद्यार्थ्यांना मोफत उत्तर पत्रिका आणि प्रश्न पत्रिका देत शिक्षण विभागाकडून परीक्षांचं आयोजन करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वीच केएसईएबीच्या वतीनं सर्व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना उत्तर पत्रिकांसंदर्भातील सूचना देण्याचे निर्देश देत विभागाच्या संकेतस्थळावर संच स्वरुपात सराव प्रश्न प्रसिद्ध केले आहेत. 


इथं विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात राज्य शासनाची भूमिका डगमगत असतानाच तिथं भाजपनं काँग्रेस शासनावर निशाणा साधला आहे. कर्नाटक सरकारला दिवाळखोरीच्या दरीत लोटणाऱ्या या काँग्रेस सरकारनं आता विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिकाही घरातूनच आणण्यास भाग पाडलं आहे. बोर्डाच्या परीक्षांसाठी स्वत:च्याच उत्तरपत्रिका... ही गोंधळाची स्थिती असून, सिद्धरामैय्या यांनी तातडीनं शिक्षण विभागाला आवश्यक आर्थिक तरतूद करत सरकारच्या दूरदृष्टीअभावी विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याकडे लक्ष द्यावं अशी मागणी उचलून धरली आहे.