Sugar Price: आता नागरिकांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. पण ऐन गणेशोत्सवात सर्वसामान्य नागरिकांचा चहा 'कडू' होण्याची शक्यता आहे. टॉमेटोचे दर महागल्यानंतर आता साखर आपला रंग दाखवणार आहे. लवकरच साखर देखील महागणार असून सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसणार आहे. सणासुदीच्या काळात साखर महागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्पादनात घट झाल्यानं साखरेचे दर वाढल्याचे सांगण्यात येत आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. कमी उत्पादन झाल्यामुळे गेल्या महिनाभरात साखरेच्या एक्स-मिल भावात प्रति क्विंटल सुमारे 150 ते 200 रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान साखरेची किरकोळ किंमत काही काळासाठी 42 रुपये प्रति किलोच्या आसपास राहील असे सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी साखर कारखानदारांना उत्तर प्रदेशात साखरेचा दर 3590 ते 370 रुपये प्रति क्विंटल, महाराष्ट्रात 3320 ते 3360 रुपये प्रति क्विंटल, कर्नाटकात 3295 ते 3345 रुपये प्रति क्विंटल आणि  गुजरातमध्ये 3340 ते 3510 रुपये प्रतिक्विंटल इतका होता. मार्च 2023 च्या सुरुवातीला तुलनेत हे भाव 150 ते 200 रुपये प्रति क्विंटल वाढले आहेत.


2022-23 च्या हंगामात (ऑक्टोबर-सप्टेंबर) साखरेचे उत्पादन 365 लाख टनांवरून 325 लाख टनांपर्यंत घसरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काही महिन्यांत साखरेच्या उत्पादनात जवळपास 11 टक्क्यांनी घट झाली. हे दर वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचे व्यापार आणि उद्योग सूत्रांनी सांगितले. 


2021-22 साखर हंगामात साखरेचे उत्पादन सुमारे 359 लाख टन होते. 2022-23 मध्ये साखरेचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा कमी असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.  महाराष्ट्रात लांबलेल्या पावसाचा यंदा उसाच्या पिकावर परिणाम झाला आहे. स्थानिक किमती वाढल्याने बलरामपूर शुगर, श्री रेणुका शुगर्स, दालमिया भारत शुगर आणि द्वारिकेश शुगर सारख्या साखर उत्पादकांच्या नफ्यात वाढ होईल आणि शेतकऱ्यांना उसासाठी वेळेवर पेमेंट करण्यास मदत होईल असे डीलर्सचे म्हणणे आहे.


असे असले तरी साखरेच्या किंमत वाढल्यामुळे अन्नधान्य महागाई वाढण्याचा धोका आहे, ज्यामुळे सरकार अतिरिक्त साखर निर्यात करु शकत नाही, असेही म्हटले जात आहे. साखरेच्या उत्पादनात घट झाली असली तरी, वाढत्या उन्हाळ्यामुळे मिठाई आणि कोला उत्पादकांसारख्या मोठ्या ग्राहकांकडून मागणी वाढली असल्याची माहिती नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचे (NFCSF) व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी बिझनेस स्टँडर्डला दिली.


साखरेवरुन केंद्र सरकार ऍक्शन मोडमध्ये


सणासुदींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्वाची पाऊले उचलली आहेच. केंद्र सरकारनं सर्व साखर कंपन्यांकडून विक्रीचा पूर्ण तपशील मागितला आहे. त्याचप्रमाणे साखरेचा साठा किती आहे? यासाठी विक्रेते, गोडाऊन मालक, होलसेलर-रिटेलर्स यांचीही यादी मागितली आहे. मे महिन्यापासून ऑगस्टदरम्यान विक्री करण्यात आलेल्या साखरेची पूर्ण माहितीजेखील मागवण्यात आली आहे. 


आज संध्याकाळपर्यंत ही सारी माहिती साखर उत्पादक कारखान्यांना द्यावी लागणार आहे. सणासुदीच्या काळात वाढत्या मागणीमुळे साखरेचे दर वाढण्याची शक्यता असते. अशावेळी साठवणूक केलेली साखर सणासुदीत जास्त दराने विकली जाण्याचीही शक्यता असते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आक्रमक भूमिकेत पाहायला मिळत आहे.