न्यायाधीश लोया मृत्यू | सीबीआय चौकशीला सर्वोच्च न्यायालयाचा नकार
न्यायाधीश लोया मृत्यू प्रकरणातील सर्व याचिका फेटाळल्या आहेत.
नवी दिल्ली : जज बी एच लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी होणार नसल्याचं, सुप्रीम कोर्टाने आज आपल्या निकालात म्हटलं आहे.जज लोया यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्या खंडपीठाने आज हा निर्णय दिला आहे.विशेष सीबीआय न्यायाधीश लोया हे सोहराबुद्दीन बनावट चकमकीच्या खटल्याची सुनावणी करत होते. या खटल्यात भाजप अध्यक्ष अमित शहा आरोपी होते.
जज लोया आपल्या सहकाऱ्याच्या मुलीच्या लग्नासाठी १ डिसेंबर २०१४ रोजी नागपूरला गेले. लोया तिथं त्यांचा मृत्यू झाला. पण कॅराव्हान मॅगेझिननं ४ महिन्यांपूर्वी लोयांचा मृत्यू संशयास्पद असल्याची बातमी दिली, यानंतर देशभर या प्रकरणाने खळबळ उडाली होती. आज याविषयीच्या सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने निकालात काढल्या आहेत.
न्यायाधीश बी. एच. लोया मृत्यू प्रकरण
महाराष्ट्र सरकारनं याप्रकरणी एका विशिष्ठ व्यक्तीला मुद्दाम टार्गेट करण्यासाठी याचिका करण्यात आल्याचं म्हटलं. तर कायद्याचं राज्य आहे ,हे जर सिद्ध करण्यासाठी न्यायाधीश लोयांच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी व्हायला हवी, असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. न्यायाधीश लोयांच्या मृत्यूनंतर घडलेल्या अनेक घडमोडींचा संदर्भ देऊन याचिकाकर्त्यांनी स्वतंत्र चौकशी मागणी केली आहे. नोव्हेंबर महिन्यात एका नियतकालिकानं न्यायाधीश लोयांच्या बहिणीच्या हवाल्यानं लोयांच्या मृत्यूविषयी संशय व्यक्त केला होता. तेव्हापासून हे प्रकरण प्रकाश झोतात आलं.