अहमदाबाद : विधानसभा निवडणुकांपूर्वी गुजरातमधील राजकीय वातावरण चांगलचं तापल्याचं पहायला मिळत आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र आलेल्या काँग्रेस आणि हार्दिक पटेलचं नेतृत्व असलेल्या पाटीदार समाजातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने रविवारी रात्री ७७ उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली. यानंतर काँग्रेस आणि पाटीदार आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपल्याचं पहायला मिळालं.


काँग्रेस-पाटीदार कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी


काँग्रेसने रविवारी रात्री ७७ उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत हार्दिक पटेलच्या जवळील समर्थकांपैकी दोघांचा समावेश आहे. त्यानंतर पाटीदार समितीचे कार्यकर्ते नाराज झाले. या दोन नेत्यांची नाव आमच्या सहमतीशिवाय यादीत टाकण्यात आल्याचं पाटीदार कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.


रात्री उशिरा पाटीदार आंदोलन समितीचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयाबाहेर जमले. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि पाटीदार समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी देखील झाली.



तिकीट वाटप करताना पाटीदार समितीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पाटीदार अनामत आंदोलन समितीने केला आहे. पाटीदार अनामत आंदोलन समितीचे संयोजक ललित वसोया यांना धोराजी मतदारसंघातून  उमेदवारी देण्यात आली आहे.