#SushantSinghRajput: `उद्धव ठाकरे बॉलिवूड माफियांच्या दबावाखाली`
उद्धव ठाकरे यांच्यावर काँग्रेसचा वरदहस्त असलेल्या बॉलिवूड माफियांचा दबाव आहे.
मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून आता शिवसेना आणि भाजपमधील राजकारण चांगलेच तापले आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दोषारोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावर बॉलिवूडमधील माफियांचा दबाव असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.
सुशांतसिंग प्रकरणावरून मुंबई-बिहार पोलीस आमने-सामने, मुंबईच्या रस्त्यावर हाय व्होल्टेज ड्रामा
सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या तपासासाठी काही दिवसांपूर्वीच बिहार पोलिसांचे एक पथक मुंबईत दाखल झाले होते. तेव्हापासून मुंबई आणि बिहार पोलीस वारंवार आमनेसामने येताना दिसत आहेत. गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी बिहार पोलिसांना महाराष्ट्रात तपासाची परवानगी देण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले होते.
'सुशांतसिंग प्रकरणी बिहार पोलिसांना तपासाची परवानगी नाही', गृहराज्यमंत्र्यांचं वक्तव्य
या पार्श्वभूमीवर सुशीलकुमार मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. बिहारचा मुलगा सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्युच्या चौकशीसाठी आलेल्या बिहार पोलिसांना मुंबई पोलिसांचे सहकार्य मिळत नाही. उद्धव ठाकरे यांच्यावर काँग्रेसचा वरदहस्त असलेल्या बॉलिवूड माफियांचा दबाव आहे. त्यामुळे सुशांत प्रकरणात जबाबदार असणाऱ्या सर्व घटकांना वाचवण्याचा जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे. काँग्रेस बिहारच्या जनतेला काँग्रेस काय तोंड दाखवेल?, असे ट्विट सुशील मोदी यांनी केले आहे. त्यामुळे आता यावर शिवसेना आणि महाविकासआघाडी सरकार काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.