नवी दिल्ली : शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादाल यांनी वादग्रस्त ट्विट केलंय. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा भारतरत्न काढून घेण्यात यावा, अशी मागणी सुखबीर सिंग यांनी ट्विटद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. राजीव गांधींनी शिखविरोधी दंगलीची योजना आखली आणि शीख हत्याकांडाकडे डोळेझाक केली. तसंच परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कराला दिल्लीत यायलाही मज्जाव केल्याचा आरोप, सुखबीर सिंग यांनी केलाय. यासाठी राजीव गांधीं यांना देण्यात आलेला भारतरत्न पुरस्कार काढून घेण्याची मागणी त्यांनी ट्विटरद्वारे केली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शीख दंगलींबाबत दोनच दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी धक्कादायक खुलासा केला होता. तत्कालिन गृहमंत्री नरसिंह राव यांनी इंद्रकुमार गुजराल यांचा सल्ला ऐकला असता तर १९८४ ची दंगल टळली असती, असं मनमोहन म्हणाले होते.


गुजराल यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त बोलताना सिंग यांनी हा खुलासा केला. परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, त्यामुळे लष्कराला पाचारण करावे, असा सल्ला गुजराल यांनी तत्कालीने केंद्रीय गृहमंत्री नरसिंह राव यांना दिला होता. त्यांचा हा सल्ला राव यांनी ऐकला असता तर १९८४ ची दंगल टाळता अली असती, असं वक्तव्य मनमोहन सिंग यांनी केलं.



गुजराल हे शिख दंगल उसळण्यापूर्वी निर्माण झालेल्या तणावामुळे चिंताग्रस्त होते. त्यांनी नरसिंह राव यांची भेटही घेतली होती. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने ते गंभीर झाले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून सरकारने लष्कराला पाचारण करायला हवे आणि जवान तैनात करायला हवेत, असे त्यांनी सांगितले होते.


शिख दंगल उसळली, त्या रात्री नरसिंह राव यांची भेटही घेतली होती. गुजराल यांनी दिलेला सल्ला राव यांनी ऐकला असता, तर शीख दंगलीतील हिंसाचार टाळता आला असता, असं मनमोहन सिंग कार्यक्रमात बोलले.