नवी दिल्ली : पुलवामा येथे जैश ए मोहम्मदने केलेल्या आत्मघाती हल्ल्याप्रमाणे आता हिज्बुल मुजाहिदीन आत्मघाती हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून देण्यात आली आहे. दुसरा हल्ला उत्तर कश्मीरमधील तंगधार भागात करण्याच्या तयारीत सुरु झाली आहे, अशी माहिती गुप्तचर विभागाच्या हाती लागली आहे. विशेष म्हणजे लष्कारच्या ताफ्यावर हल्ला करण्यासाठी पुन्हा २०० किलो स्फोटके भरून एका हिरव्या रंगाच्या गाडीतून असा हल्ला करण्याचा प्रयत्न असल्याचा अॅलर्ट लष्कर आणि सीआरपीएफ, तसेच संरक्षण यंत्रणांसाठी जारी करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


हिरव्या रंगाच्या स्कॉर्पिओला यासाठी तयार केले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. चौकीबाल आणि तंगधार या दरम्यान हा हल्ला होणार असल्याची माहिती आहे. हल्ल्यासाठी स्थानिक काश्मिरी तरूणांची साथ घेतली जात असल्याची गुप्तचर विभागाला मिळाली आहे. त्याचप्रमाणे सीमेपलीकडून ५ ते ६ दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत आहेत. त्यांना पाकिस्तानकडून सहकार्य करण्यात येत असल्याचे समजते. गुरेझ सेक्टरमध्ये या संभाव्य घुसखोरीच्या तयारीत आहेत. दरम्यान पुलवामा इथे झालेल्या हल्ल्यानंतर एनआयएच्या शोधपथकाला सापडलेला लोखंडी तुकडा महत्त्वाचा दुआ सिद्ध होऊ शकतो. या लोखंडी तुकड्यावरून या गाडीच्या चॅसीचा नंबर शोधण्याचा आणि त्याद्वारे मालकाचा शोध घेण्याच सुरक्षा दलांचा प्रयत्न आहे. 


दरम्यान, पुलवामा हल्ल्याची फार मोठी ठेच लागलेल्या गृहखात्याने आता महत्त्वाचा निर्णय घेतलाय. सर्व निमलष्करी दलांच्या ताफ्यांची वाहतूक आता हवाई मार्गानेच केली जाणार आहे. सर्व प्रकारच्या श्रेणीतल्या सैनिकांची वाहतूक यापुढे केवळ विमानाने करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेत.