काँग्रेस नेता म्हणाला; मुख्यमंत्र्यांना झोपडीसाठी जमीन देऊ
उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुकीसाठीचे मतदान पार पडलं आहे. तर, उत्तर प्रदेशात 7 पैकी 4 टप्प्यातील मतदान पूर्ण झालंय. त्यामुळे आता उरलेल्या तीन टप्प्यांसाठी विविध राजकीय पक्षांचे नेते निवडणूक प्रचारासाठी उत्तर प्रदेशमध्ये दाखल होत आहेत.
लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया 7 टप्प्यात ठेवण्यात आली होती. त्यापैकी ४ टप्प्यात मतदान झालंय. उरलेल्या पाच, सहा आणि सातव्या टप्प्यासाठी अनुक्रमे 27 फेब्रुवारी, 3 आणि 7 मार्च रोजी मतदान होत आहे.
उर्वरित तीन टप्प्यांच्या प्रचारासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते उत्तर प्रदेशमध्ये येत आहेत. एकीकडे सत्ताधारी भाजपचे नेते तर दुसरीकडे विरोधकांचे नेतेही येथे येत असल्यामुळे प्रचाराची रंगत वाढतेय.
उत्तराखंड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी प्रयागराजमध्ये प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
काँग्रेस नेते हरीश रावत यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाचा दावा करतानाच यूटीपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना नाहुत सल्ला दिलाय. योगी हे अध्यात्मिक आहेत. पण, ते भाजपच्या जाळ्यात अडकले आहेत, असे ते म्हणाले.
उत्तराखंडमध्ये भाजपचा पराभव होत आहे. पण, योगी हे आपले छोटे भाऊ आहेत. त्यामुळे पराभव झाल्यानंतर त्यांनी उत्तराखंडमध्ये परत यावं. आम्ही त्यांचं स्वागत करू. तसंच, त्यांना तिथे एक छोटी झोपडी बांधण्यासाठी आम्ही जमीन देण्यास तयार आहोत.
त्या झोपडीत त्यांनी अध्यात्म योगाची साधना करावी आणि आपलं उरलेलं आयुष्य मजेत जगावं. येथे झोपडी बनवून तो अध्यात्मात लीन होऊ शकेल, असा शब्दात हरीश रावत यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधलाय.
काँग्रेस पुनरागमन करेल
1980 मध्ये काँग्रेस कुठेच राहिली नव्हती. यानंतर ‘इंदिरा लाओ, देश बचाओ’चा नारा प्रत्येक गावात घुमला. त्यानंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत आली. तसेच आता "प्रियंका लाओ"चा नारा उत्तर प्रदेशातील जनतेच्या ओठावर आहे. त्यामुळे इथेही पुन्हा काँग्रेस परतणार आहे, असा दावा त्यांनी केला.