नवी दिल्ली: देशभरात नवा मोटर वाहन कायदा लागू झाल्यापासून दंडाच्या रक्कमेत भरघोस वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्या ट्रक चालकाला २,०५,००० रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. दंडाच्या विक्रमी रक्कमेमुळे ही घटना देशभरात चर्चेचा विषय ठरली होती. न्यायालयाने दंडाची अर्धी रक्कम ट्रक चालकाने तर अर्धी रक्कम ट्रकच्या मालकाने भरावी, असे आदेश दिले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर संबंधित ट्रकच्या मालकाने दिल्लीच्या रोहिणी कोर्टात दंडाची ही रक्कम भरल्याचे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे. ट्रकमध्ये प्रमाणापेक्षा अधिक सामान, चालकाकडे परवाना नसणे आणि वाहनाची कागदपत्रे (Registration Certificate) नसल्यामुळे तब्बल २ लाख ५०० रुपयांचे चलान फाडण्यात आले होते. चालक ट्रक चालवण्यासाठी तंदरुस्तही नव्हता अशीही नोंद वाहतूक पोलिसांनी नोंदवली होती. यापूर्वी राज्यस्थानात एका ट्रक चालकाला एक लाख ४१ हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता. 


दरम्यान, वाहतुकीच्या कडक नियमांची अंमलबाजवणीनंतरही देशभरात अनेक ठिकाणी वाहनचालक सिग्नलचे नियम तोडताना दिसत आहेत. दिल्ली पोलिसांनी अवघ्या पाच दिवसांमध्ये २० ते २५ हजार जणांना दंड ठोठावल्याचे दिसत आहे. यामध्ये सिग्नलचे नियम तोडणाऱ्या २५०० जणांचा समावेश असल्याचे समजते. 



आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाराजी टाळण्यासाठी महाराष्ट्रात अजूनही या नियमांची अंमलबजावणी झालेली नाही. तर गुजरात राज्य सरकारने केंद्राच्या दंडात्मक रकमेत कपात करण्याचा निर्णय घेतला होता.