नवी दिल्ली: कोरोना व्हायरसमुळे देशभरात निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. त्यानुसार आता बँक ग्राहकांना त्यांच्या खात्यात किमान रक्कम (मिनिमम बॅलेन्स) ठेवण्याची गरज नाही. तसेच डेबिट कार्डधारकांना पुढील तीन महिने कोणत्याही बँकेच्या एटीएममधून विनाशुल्क पैसे काढता येणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. याशिवाय, सरकारकडून दिवाळखोरी आणि नादारी संहितेतही काही बदल करण्यात आली आहेत. त्यासाठी आता दिवाळखोरीची मर्यादा १ लाखांवरून १ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच रिझर्व्ह बँक आणि अर्थमंत्रालय देशातील सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही सीतारामन यांनी सांगितले. भांडवली बाजारात निर्माण झालेल्या अस्थिरतेबाबत सेबीशी आमचे बोलणे झाले आहे. यासंदर्भात 'सेबी'कडून काही उपाययोजना सुचविण्यात आल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. 



 


दरम्यान, कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार असल्याची घोषणाही यावेळी सीतारामन यांनी केली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे व्यापारी आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्या उत्पन्नाचा स्रोत बंद झाला आहे. आगामी काळात अर्थव्यवस्थेवर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. या गोष्टी लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून आर्थिक पॅकेज जाहीर करणार आहे.