नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे देशात गंभीर स्थिती निर्माण होऊ नये म्हणून सरकारकडून महत्त्वाची पाऊलं उचलली जात आहेत. त्यातच आता तृणमूल काँग्रेस (TMC) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाने आपल्या खासदारांना संसदेच्या सत्रात सहभागी न होण्याच्या सूचना दिल्या आहेत. खासदारांना आपल्या मतदारसंघात परत जाण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. टीएमसीचे राज्यसभा खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी संसदेच्या अधिकाऱ्यांना 23 मार्चला संसदेचं कामकाज बंद ठेवण्यासाठी पत्र दिलं आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील खासदारांना दिल्लीत न जाता मतदारसंघात कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी प्रशासनाला आणि लोकांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभेत टीएमसीचे 22 खासदार आहेत. तर राज्यसभेत 13 खासदार आहेत. टीएमसी मागील 10 दिवसापासून कोरोनामुऴे संसदेचं कामकाज बंद ठेवण्याची मागणी करत आहे. पण आता टीएमसीने पक्षाच्या खासदारांना दिल्लीहून बोलवून घेतलं आहे.


राज्यसभेत जवळपास 44 टक्के आणि राज्यसभेत 22 टक्के खासदार हे 65 वर्षाहून अधिक वय असलेले आहेत. फक्त खासदारांसाठीच नाही तर जे हजारो लोकं येथे येतात त्यांच्यासाठी ही महत्त्वाचं आहे. असं खासदार डेरेर ओ ब्रायन यांनी म्हटलं आहे.


कोरोनाचे रुग्ण देशात वाढत चालले आहेत. इतकंच नाही तर काही खासदारांपर्यंत देखील कोरोनाचे रुग्ण पोहोचल्याने संसदेत देखील कोरोना कधी पोहोचेल हे सांगता येत नाही. संसदेचं सत्र अजून सुरु आहे. पंतप्रधान मोदी यांनी हे सत्र 3 एप्रिलपर्यंत चालेल असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.