गळ्यात रुद्राक्ष, भगवा पोषाख... काशी विश्वनाथ मंदिरात तैनात असलेल्या पोलिसांना आता पुजारींचा ड्रेसकोड
काशी विश्वनाथ मंदिराच्या गर्भगृहात तैनात असलेल्या पोलिसांच्या पोशाखात बदल करण्यात आला आहे. भाविकांमध्ये तैनात करण्यात आलेले पोलीस आता पुजारिंच्या पोषाखात दिसणार आहेत. पोलिसांच्या गळ्यात रुद्राक्ष, कपाळावर त्रिंपुड आणि भगवे कपडे असा पोलिसांचा पोषाख असणार आहे.
Kashi Vishwanath Temple Police Dress Code : वाराणसीतल्या काशी विश्वनाथ मंदिरात जगभरातील लाखो भाविक (Devotee) दर्शनासाठी येत असतात. भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता पोलीस आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता काशी विश्वनाथ (Kashi Vishwanath Temple) गर्भगृहातील पोलिसांचा पोषाख मंदिरातील पुरोहितांसारखा असणार आहे. मंदिरात तैनात असलेल्या पोलिसांच्या गळात रुद्राक्ष, कपाळावर त्रिपुंड आणि भगवे कपडे असा पोषाख असणार आहे.
मंदिरात पोलिसांचा बंदोबस्त असल्याने दूरवरून येणाऱ्या भाविकांना धक्काबुक्की होत होती. याशिवाय गैरव्यवहारासारख्या तक्रारीही प्राप्त होत होत्या. याची दखल घेत वाराणसीचे पोलीस आयुक्त मोहित अग्रवाल यांनी मंदिरात पोलिसांची स्वतंत्र व्यवस्था असावी, असा निर्णय घेतला असून, त्यासाठी काशी विश्वनाथ मंदिराच्या गर्भगृहात पुजाऱ्यांच्या वेशात पोलीस तैनात केले जाणार आहेत.
मंदिरातील पुजाऱ्यांच्या बोलण्याला मान असतो, भाविक पुजाऱ्यांचं बोलणं ऐकतात. त्यामुळे धक्काबुक्की टाळण्यासाठी पोलिस पुजऱ्यांच्या वेशभूषेत असतील. गर्भगृहात तैनात असलेले पोलीस भाविकांना मार्गदर्शनही करणार आहेत. गर्दीच्या वेळी भाविक हरवून जातात आणि त्यांना बाबा विश्वनाथांचे दर्शन घेता येत नाही, अशा भाविकांना पोलिसांची मदत होणार आहे.
भाविकांवर पूर्ण लक्ष देण्यात येणार
मंदिरातील सर्व पोलीस पुरोहितांच्या वेशात नसणार तर काही पोलिस त्यांच्या गणवेशात तैनात असणार आहेत. महिला पोलिस महिलांना दर्शनानंतर पुढे जाण्याचे आवाहन करतील. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार या नवीन प्रयोगात 'नो टच पॉलिसी' असणार आहे. कारण व्हीआयपी मूव्हमेंट दरम्यान पोलिसांकडून भाविकांना धक्काबुक्की करुन बाजूला केलं जातं.. यामुळे भाविकांना त्रास होतो आणि ते नकारात्मक विचारांनी मंदिर सोडतात.
व्हीआयपी मुव्हमेंट दरम्यान भाविकांना त्रास होणार नाही
मंदिरात दर्शनासाठी एखादा व्हीआयपी आला तर दोरखंडाने वर्तुळ बनवले जाईल. यामुळे भाविक धक्का न लावता आपोआप ठराविक अंतरावर थांबतील. मंदिरात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना तीन दिवसांचं प्रशिक्षण दिलं जाईल. मंदिरातील ड्युटी पोलिस स्टेशनमधील ड्युटीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.
पोलिसांना विनयशीलतेचं प्रशिक्षण
मंदिरात तैनात असलेल्या पोलिसांना विनयशीलतेबरोबरच इतर भाषांचंही ज्ञान दिलं जाणार आहे. परराज्यातून येणाऱ्या भाविकांना मार्गदर्शन करता येणार आहे. यासाठी प्रशासनाकडून मंदिरात हेल्प डेस्कची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रशिक्षणादरम्यान पोलिसांना काशीतील महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती दिली जाईल आणि त्यांना भाविकांना देण्यासाठी पॅम्प्लेटही देण्यात येतील.