नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हापूर येथे एक भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि कारमध्ये झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर, चार जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर मेरठ येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, दूधाचा ट्रक आणि कार यांच्यात हा अपघात झाला आहे. कारमध्ये एकूण ११ प्रवासी होते. कार चालकाला गाडी चालवत असताना डुलकी लागल्याने अपघात झाल्याचं बोललं जात आहे. कारमधील सर्व प्रवासी हे दिल्लीतील वेलकम परिसरातून संभल येथे जात होते.


बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. गढमुक्तेश्वरच्या राज्य महामार्गावर बनलेला उड्डाणपूल ओलांडल्यानंतर भरधाव वेगात असलेली ईको कार दुधाच्या ट्रकला जाऊन धडकली. कारचा वेग इतका होता की चालकाचं नियंत्रण सुटलं असं बोललं जात आहे.


हा अपघात इतका भीषण होता की, कार आणि ट्रक यांच्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी तब्बल अर्धातास लागला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, एकाचा रुग्णालयात नेण्यापूर्वी मृत्यू झाला.