Railway Track Blast : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी उद्घाटन केलेल्या उदयपूर - अहमदाबाद रेल्वे मार्गावर (udaipur ahmedabad railway track) स्फोट (Blast) घडवण्यात आला होता. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होता. प्राथमिकदृष्ट्या रेल्वे रुळ  उडवण्यासाठी हा सर्व प्रकार केल्याचे वाटत आहे. रेल्वे रुळाशेजारी दारुगोळाही सापडला होता. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. पोलिसांच्या तपासात आता धक्कादायक माहिती समोर आलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे ट्रॅक उडवण्यामागे कोणताही दहशतवादी किंवा नक्षलवादी संबंध नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा स्फोट जमिनीच्या मोबदला न मिळाल्याने घडवण्यात आल्याची माहिती देण्यात आलीय. या संपूर्ण प्रकरणाबाबत राजस्थान अतिरिक्त पोलीस महासंचालक अशोक राठोड यांनी सांगितले की, आरोपीला जमिनीचा मोबदला किंवा नोकरी न मिळाल्याने त्याने हे कृत्य केले.


45 वर्षांनंतरही ना मोबदला मिळाला ना नोकरी


ओढा पुलावर बॉम्बस्फोट घडवणाऱ्या मुख्य आरोपीने त्याच्या भाच्यासह हे कृत्य केले. 1974-75 आणि 1980 मध्ये आरोपीच्या कुटुंबाची 70 बिघे (35 एकर) जमीन रेल्वे लाईन आणि हिंदुस्थान झिंकसाठी घेण्यात आली होती. जमीन घेतल्याच्या 45 वर्षांनंतरही आरोपीला ना मोबदला मिळाला ना नोकरी. त्यामुळे आरोपींनी ट्रॅकच्या दोन्ही बाजूंना 40-40 डिटोनेटर जिलेटिनने बांधले आणि वायर वापरून दोन बॉम्ब लावून सोफ्ट घडवून आणले. स्फोटानंतर आरोपींनी पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. 


भाच्यासोबत मिळून आरोपीचे धक्कादायक कृत्य


मात्र पोलिसांनी सखोल तपास करत आरोपींना अटक केली. आरोपीला अटक केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आलाय. अशोक राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी धुलचंद मीना (32) याने आपल्या भाचांसोबत मिळून हे कृत्य केले. सध्या चारही आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना उदयपूर येथे ठेवण्यात आले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. एटीएसने अटक केलेले  आरोपी एकलिंगपुरा पोलीस ठाण्याच्या जव्हार माईन्स येथील रहिवासी आहेत.


स्फोट कसा केला?


पोलिसांनी सांगितले की, या परिसरात स्फोटाचे साहित्य विकणाऱ्या व्यावसायिकाला या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे स्फोटके तयार करण्यात आणि पेरण्यात कुशल आहेत. रेल्वे गेल्यानंतर आरोपी पुलावर गेले होते. त्यांच्यापैकी एकाने बाईक सुरु ठेवली होती. धुलचंदने भाच्यासोबत रेल्वे ट्रॅकवर स्फोटके पेरली आणि ते पेटवून दिले. त्यानंतर तिघेही तेथून बाईकवरुन पळून गेले.


अशी झाली अटक


उदयपूरचे पोलीस अधीक्षक विकास शर्मा आणि त्यांची सहकारी सातत्याने आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी सुरुवातीपासूनच या रेल्वे रुळामुळे कोणाचे नुकसान होत आहे का अंगाने तपास सुरु केला. लोकांकडे चौकशी केली असताना काही लोक मोबदला न मिळाल्याने रेल्वे कार्यालयाच्या सातत्याने चकरा मारत होते असे सांगितले. त्यानंतर पोलिसांना धुलचंदला पकडून त्याची चौकशी केली असता त्याने संपूर्ण हकीकत सांगितली. धुलचंदने 25 रुपये दराने 80 डिटोनेटर्स खरेदी केले होते. 


पंतप्रधान मोदींनी 31 ऑक्टोबरला केले होते उद्घाटन


16 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर उदयपूर-अहमदाबाद ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 ऑक्टोबर 2022 रोजी असरवा स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवला होता. यावेळी विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया, उदयपूरचे खासदार अर्जुनलाल मीना, चित्तोडगडचे खासदार सीपी जोशी आणि बांसवाड्याचे खासदार कनकमल कटारा हे देखील उपस्थित होते.