Uddhav Thackeray Group Slams PM Modi: "मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्यांनी स्वतः बहुमत गमावले व गुजराती व्यापारी पद्धतीचे जुगाड करून त्यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली, पण मोदी यांनी शपथ घेतल्यापासून देशात सर्वत्र पडझड सुरू झाली आहे," असा खोचक टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे. "भविष्यातील अशुभाचे संकेत देणारी तर ही पडझड नाही ना? संसदेचे अधिवेशन सुरू असतानाच दिल्ली विमानतळावरील टर्मिनल-1 चे भव्य छत कोसळले व त्याखाली अनेक प्रवासी आणि वाहने दबली गेली आहेत. ही दुर्घटना भयंकर आहे. मोदी यांनी देशातील सर्व विमानतळे त्यांच्या उद्योगपती मित्रांच्या ताब्यात दिली आहेत. त्यामुळे या विमानतळांवर खोऱ्याने पैसा ओढला जातो; पण स्वच्छता, सुरक्षा, सुविधा, मेन्टेनन्स अशा गोष्टींची बोंबच आहे," असा निशाणा ठाकरे गटाने साधला आहे.


ते विमानतळही कोसळले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"दिल्लीचे विमानतळ हे अत्यंत महत्त्वाचे व संवेदनशील ठिकाण आहे. रोज लाखो प्रवासी, नातेवाईक, गाडय़ा यांची वर्दळ येथे आहे. या विमानतळाचे छत कोसळून हाहाकार माजणे हे काही चांगले लक्षण नाही. विमानतळाचे बांधकाम करणारे ठेकेदार कोणी नेमले? नेहमीप्रमाणे ते गुजरात राज्याचे लाभार्थी होते काय, यावर प्रकाश टाकणे गरजेचे आहे. दिल्ली विमानतळाचे छत कोसळत असताना 450 कोटी रुपये खर्च करून बनवलेल्या जबलपूर विमानतळाचा मोठा भागही कोसळून पडला. या विमानतळाचे उद्घाटन मोदी यांनी फक्त तीन महिन्यांपूर्वी म्हणजे 10 मार्च 2024 ला केले होते, ते विमानतळ कोसळले," असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.


अशुभ घटनांच्या मालिकेने लोकांत निरुत्साह


"मुंबई-न्हावा शेवा अशा अटल सेतूचे उद्घाटन मोदी यांनी केले. 18 हजार कोटींचा खर्च या सेतूवर झाला. उद्घाटनानंतर सेतूवरून मोदी एकटेच चालत असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. त्या अटल सेतूलाही अनेक ठिकाणी तडे गेल्याचे उघड झाले आहे. बिहारच्या कृष्णजंग जिल्ह्यात पूल कोसळला आहे. या आठवड्यात बिहारात पाच पूल कोसळले. नितीश कुमार यांनी मोदी यांना पाठिंबा दिल्यापासून बिहारच्या बाबतीत बरेच काही अघटित घडू लागल्याचे चित्र दुःखद आहे. नितीश कुमार यांच्या प्रकृतीबाबतही उलटसुलट बातम्यांचे पेव फुटले आहे. केंद्रात नवे सरकार आले, पण अशा अशुभ घटनांच्या मालिकेने लोकांत निरुत्साह आहे," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.


अशुभाच्या सावल्या अयोध्येवर का घिरट्या घालीत आहेत?


"राष्ट्रीय परीक्षांच्या पेपरफुटींमुळे तरुण वर्गात कमालीचा संताप आहे. एका पिढीच्या भवितव्याशी खेळ करणारे ठेकेदार केंद्रीय सत्तेच्या आसपास वावरत आहेत व त्यांना अटक करायचे सोडून सरकारने लहान मासे जाळ्यात पकडले आहेत. मोदी यांनी मागच्या दहा वर्षांत ज्याला हात लावला ते कोसळून पडले. अयोध्येतील राममंदिराची अवस्था बिकट आहे. व्हॅटिकनपेक्षा अयोध्या भव्य बनवण्याची घोषणा होती. जगाला अभिमान वाटेल असे मंदिर बनवण्याची भाषा होती. मोदी यांनी राममंदिर उद्घाटनाचा राजकीय उत्सव साजरा केला, पण फक्त पाच महिन्यांत पहिल्याच पावसाने राममंदिर गळू लागले. मंदिराच्या गर्भगृहातच पाणी साचले. अयोध्येत भिंती खचल्या, रस्ते खचले. घरांत, धर्मशाळेत पाणी घुसले. यापूर्वी हे कधीच घडले नव्हते. मग अशुभाच्या सावल्या अयोध्येवर का घिरट्या घालीत आहेत. मोदी यांनी अयोध्या व राममंदिराचे कार्य मनावर घेतले होते, पण श्रीराम खूश नाहीत का?" असा प्रश्न ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.


शंकांचे काहूर लोकांच्या मनात


"केंद्रातील सध्याचे सरकार हे अनैसर्गिक पद्धतीने आले आहे काय? भाजपने मिळवलेल्या 240 जागा या खऱ्या नसून त्यातील काही जागा या गैरमार्गाचा अवलंब करून मिळवल्याने व त्याच गैरमार्गाने सत्ता स्थापन केल्याने ही अशी पडझड सुरू झाली आहे काय? अशा शंकांचे काहूर लोकांच्या मनात उठले असेल तर त्यात नवल नाही," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.


ठेकेदरांसाठी जे उभारलं ते तिसऱ्या कालखंडात कोसळत आहे


"मोदी तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यापासून ‘जय संविधान’ बोलण्यावर जणू अघोषित बंदीच आणली आहे. संसदेत संविधानाचा उल्लेख करणाऱ्या खासदारांना लोकसभेचे अध्यक्षच दम भरत आहेत. हे चित्र स्वातंत्र्यवीरांचे आत्मे अस्वस्थ करीत असेल. संविधानास हा विरोध म्हणजे देशातील अशुभाची सुरुवात आहे. देशाचा पायाच त्यामुळे ढासळू शकतो. गेल्या महिन्यापासून देशात जणू अशुभ पर्वाचीच सुरुवात झाली आहे व वातावरण गुदमरल्यासारखे बनले आहे. पंतप्रधानपदी मोदी आले, पण त्यांच्याही चेहऱ्यावर कोठे आनंदाची झलक दिसत नाही. संपूर्ण सरकारच अस्थिर व मृत्युशय्येवर पडल्यासारखे दिसत आहे. जणू निसर्गही निराशेचे उसासे सोडत आहे. मोदी यांना मानणारा वर्गही आनंदाच्या हिंदोळ्या वर बसलेला दिसत नाही. मग देशातील निवडणुकांनी नक्की काय बदल घडवला? तेच कारस्थानी, कपटी, कळकट, मळकट चेहरे त्याच खुर्च्यांवर बसले. त्यांच्या खुर्च्यांतील ढेकूणही तेच व माणसेही तीच. मागच्या दहा वर्षांत नवे काही उभारले नाही. गुजरातच्या ठेकेदारांना पैसे मिळावेत म्हणून जे उभारले ते मोदींच्या तिसऱ्या कालखंडात कोसळत आहे," अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.


अशुभाच्या सावल्या रोखायला हव्यात


"पंडित नेहरू व त्यांच्या काँग्रेसने 60 वर्षांत जी उभारणी केली, तीच मजबूत आहे. त्या उभारणीला साधा तडाही गेला नाही, पण दहा वर्षांतील ठेकेदारी सर्वत्रच पडझडीने संपत आहे. संविधानाचे पावित्र्यही या काळात पडले. विमानतळ, रस्ते, पूल, अयोध्या सर्वत्रच पडझड सुरू आहे. अशुभाच्या सावल्या पसरण्यापूर्वीच रोखायला हव्यात," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.