उद्धव ठाकरे अयोध्येत भाजपला शह देणार की काटशह मिळणार?
अयोध्येतील सभेविषयी शिवसेना नेत्यांमध्ये एकमत नाही?
मुंबई : उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. अयोध्येत त्यांच्या सभेला परवानगी मिळेल की नाही, याबाबत अजूनही साशंकता आहे. शिवसेना-भाजपात सुरु असलेल्या शह-काटशहाच्या राजकारणाचा हा भाग असण्याची शक्यता आहे.
राम मंदिराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाब विचारण्याच्या भूमिकेत असलेल्या उद्धव ठाकरेंची अयोध्येत सभा होणार का? याबाबत आता साशंकता आहे. अयोध्येत शरयू नदी तिरावर सभेला बंदी आहे, त्यामुळे सभेऐवजी तिथे जनसंवाद होण्याची शक्यता आहे. सभेच्या परवानगीसाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्याचीही चर्चा आहे. मात्र, या भेटीनंतर त्यांनी स्पष्टपणे काहीही सांगितलेलं नाही... तर दोन दिवसांत सभेबाबत कळेल असं उद्धव ठाकरे सांगत आहेत.
दुसरीकडे अयोध्येत सभा व्हावी, की होऊ नये? याबाबत शिवसेना नेत्यांमध्ये एकमत नसल्याची चर्चा होती, त्याचा उद्धव यांनी इन्कार केलाय. राम मंदिराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेश सरकारलाच धारेवर धरणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा मित्रपक्ष भाजप सहजासहजी होवू देईल का? हाही प्रश्नच आहे.
उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्याच दिवशी विश्व हिंदू परिषदेची हुंकार रॅली अयोध्या, बंगळुरु, नागपूर या ठिकाणी होणार आहे. लोकसभा निवडणुकांसाठी राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. या निमित्तानं भाजपा-शिवसेनेत श्रेयवादाची लढाई पुन्हा सुरु झालीय.