Union Budget 2018: रेल्वे विकासासाठी १.४८ हजार कोटींची तरतूद : अरुण जेटली
देशभरात ६०० नव्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. रेल्वे विकासासाठी १ लाख ४८ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : देशभरात ६०० नव्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. तसेच वाय-फाय सेवा सुरु करण्यात येणार आहे. रेल्वे विकासासाठी १ लाख ४८ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर ३६०० किमीची ट्रॅक नव्याने बांधण्याचे काम हाती घेतले आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर करताना दिली.
रेल्वेस्थानकांचा विकास
रेल्वे सेवेच्या विकासासाठी वर्षात १ लाख ४८ हजार कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक आणि परिसरात विविध सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्याचवेळी ६०० रेल्वेस्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.
रेल्वे जाळे मजबूत करण्यावर भर
रेल्वे मार्गांची काळजी घेण्यावर जास्त भर देण्यात आलेय. रेल्वे जाळे मजबूत करणे आणि प्रवासी क्षमता वाढविण्याला सरकारचे प्राधान्य असेल, असे अरुण जेटली यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, मुंबई लोकलवरील नवीन मार्गांसाठी ४० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेय. यात एलिव्हेटेड मार्गाचाही समावेश असणार आहे. तर ९ हजार किलोमीटरचे मार्ग बांधण्याचं सरकारचं लक्ष्य, असल्याची माहिती जेटली यांनी दिली.
३ हजार ६०० किमीचे नवीन मार्ग
३ हजार ६०० किमीचे नवीन मार्ग असून पुढील दोन वर्षांत ४२६७ मानवरहित रेल्वे क्रॉसिंग बंद केली जातील. १८००० किमीचे रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण करण्यात येणार आहे. तसेच बंगळुरमधील उप-नगरीय रेल्वे विकासासाठी १७,००० कोटींची तरतूद करण्यात आलेय.