पंतप्रधानांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक; काश्मीरसंदर्भात मोठा निर्णय घेणार?
काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५ अ हटवण्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सोमवारी सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी साधारण साडेनऊच्या सुमारास बैठकीला सुरुवात होईल. या बैठकीत जम्मू-काश्मीरसंदर्भात मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीत काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५ अ हटवण्यासंदर्भात चर्चा केली जाईल. तत्पूर्वी काश्मीरमधील तणाव परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिवांची भेट घेतली.
जम्मू-काश्मीर सरकारने रविवारी लागू केलेल्या आदेशानुसार राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. तर श्रीनगरमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. जम्मूतील ८ जिल्ह्यांमध्ये लष्कराच्या ४० कंपनी तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय, काश्मीरमधील स्थानिक पक्षांच्या प्रमुखांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री व पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांचा समावेश आहे.
श्रीनगरमधील जमावबंदी १५ ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या मध्यरात्रीपर्यंत ही जमावबंदी लागू राहील. याशिवाय, रविवारी संध्याकाळपासून परिसरातील मोबाईल, ब्रॉडबँड, इंटरनेट आणि केबल टीव्ही सेवाही बंद करण्यात आल्याचे वृत्त आहे.
काश्मीरला वाजपेयींची सर्वात जास्त उणीव आता जाणवतेय- मेहबुबा मुफ्ती
गेल्या आठवड्यातच केंद्र सरकारने पर्यटकांना काश्मीर सोडण्याचे आदेश दिले होते. यानंतर रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली होती. यावेळी जम्मू-काश्मीरमधील तणावपूर्ण परिस्थितीसंदर्भात चर्चा झाल्याचे वृत्त आहे.
या परिस्थितीमुळे काश्मीरमधील विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. लवकरच नव्या तारखांची घोषणा केल्या जातील, असे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले.
श्रीनगरमध्ये १५ ऑगस्टपर्यंत जमावबंदी; मेहबुबा मुफ्ती, ओमर अब्दुल्लांसह प्रमुख नेते नजरकैदेत