श्रीनगरमध्ये १५ ऑगस्टपर्यंत जमावबंदी; मेहबुबा मुफ्ती, ओमर अब्दुल्लांसह प्रमुख नेते नजरकैदेत

काश्मीर खोऱ्यातील इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद

Updated: Aug 5, 2019, 08:01 AM IST
श्रीनगरमध्ये १५ ऑगस्टपर्यंत जमावबंदी; मेहबुबा मुफ्ती, ओमर अब्दुल्लांसह प्रमुख नेते नजरकैदेत title=

श्रीनगर: गेल्या काही दिवसांमध्ये लष्करी हालचाली वाढल्यामुळे अस्वस्थता निर्माण झालेल्या काश्मीर खोऱ्यातील तणावपूर्ण शांततेत आणखी भर पडली आहे. जम्मू-काश्मीर सरकारने रविवारी रात्रीपासून श्रीनगर जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू केले. १५ ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या मध्यरात्रीपर्यंत ही जमावबंदी लागू राहील. याशिवाय, रविवारी संध्याकाळपासून काश्मीर खोऱ्यातील मोबाईल, ब्रॉडबँड, इंटरनेट आणि केबल टीव्ही बंद करण्यात आल्या आहेत. 

याशिवाय, काश्मीरमधील स्थानिक पक्षांच्या प्रमुखांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री व पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांचा समावेश आहे. 

सरकारच्या आदेशानुसार सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच पुढील आदेश येईपर्यंत काश्मीरमधील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय, कोणतीही सार्वजनिक सभा आणि मोर्चा काढण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. 

दरम्यान, मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांच्या अटकेमुळे काश्मीर खोऱ्यातील तणाव आणखीन वाढण्याची शक्यता आहे. ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करून आपल्याला नजरकैदेत ठेवण्यात आल्याची माहिती दिली. माझ्या मते मला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. इतर स्थानिक नेत्यांनाही नजरकैदेत ठेवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यामध्ये कितपत तथ्य आहे, हे माहिती नाही. मात्र, हे सर्व खरे असेल तर आपण दुसऱ्या बाजूला भेटू. अल्लाह आपले रक्षण करो, असे ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

तर मेहबुबा मुफ्ती यांनीही आपल्याला नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे ट्विटरवरून सांगितले. काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. लवकरच मोबाईल सेवाही बंद होऊ शकते. जमावबंदी लागू होऊ  शकते. आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे, हे देवच जाणो, असे मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले. 

तत्पूर्वी रविवारी जम्मू-काश्मीरमधील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मेहबुबा मुफ्ती यांना जम्मू-काश्मीर बँक भरती प्रक्रियेतील गैरव्यवहारप्रकरणी नोटीस पाठवली. तर, राष्ट्रीय तपास यंत्रणेने अपक्ष आमदार इंजिनियर रशीद यांना समन्स बजावले होते. 

या सगळ्या घडामोडींमुळे काश्मीर खोऱ्यातील तणावात भर पडली आहे. संपूर्ण खोऱ्यात निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.