लग्नानंतर सातव्याच दिवशी सापडला नववधूचा मृतदेह; कुटुंबियांचा केला गंभीर आरोप
UP Crime : लग्नाच्या सातव्याच दिवशी संशयास्पद परिस्थितीत नवविवाहित महिलेचा मृतदेह रस्त्यापासून थोड्या अंतरावर झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे एकच खळबळ उडाली होती. ग्रामस्थांनी मृतदेह पाहून पोलिसांना याची माहिती दिली.
UP Crime : उत्तर प्रदेशातील (UP News) केकानपूर ग्रामीण भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर सहा दिवसांनीच नवविवाहितेचा मृतदेह घराच्या बागेत झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. नव्या नवरीचा मृतदेह पाहून तिथून जाणाऱ्या गावकऱ्यांना धक्काच बसला. गावकऱ्यांनी महिलेच्या कुटुंबियांना आणि स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (UP Police) घटनास्थळ गाठून नवविवाहित महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
सात दिवसांपूर्वीच झाला होता विवाह
कानपूरच्या रीनाचा विवाह रसुलाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सूरज नावाच्या तरुणाशी 7 जून रोजी झाला होता. मात्र लग्नानंतरच काही दिवसांपासून घरात भांडणे सुरू झाली. रीनाने तिच्या कुटुंबियांना या वारंवार होणाऱ्या भांडणांबाबत माहिती दिली होती. लग्नाच्या 2 दिवसानंतरच रीना आणि सूरजमध्ये वाद सुरू झाला होता. लग्नाच्या सहाव्या दिवसापर्यंत हा वाद सुरू होता. मात्र सातव्याच दिवशी सकाळी दहा वाजता रीनाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. नवविवाहितेचा लटकलेला मृतदेह पाहून गावात एकच खळबळ उडाली. नवविवाहितेच्या नातेवाईकांना मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कुटुंबियांनी घटनास्थळी पोहोचून एकच आक्रोश केला.
विवाहितेला होत होती मारहाण
सासरच्या लोकांवर गंभीर आरोप करत मृत रीनाच्या भावाने सांगितले की, रीना आणि सूरज यांच्यात लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून भांडण सुरू होते. सूरजला दारू पिण्याचे व्यसन होते. यावरून रीना आणि सूरजमध्ये वाद झाला होता. रीनाच्या भावाने सासरवर आरोप करत सांगितले की, इतक्या मोठ्या भांडणानंतर जेव्हा माझी बहीण घराबाहेर जात होती, तेव्हा तिला कोणी अडवले का नाही?. इतर नातेवाईकांनीही सांगितले की, सोमवारी रात्री उशिरा सूरज आणि रीना यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर सूरजने पत्नी रीनाला मारहाण केल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळ गाठून रीनाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी शवविच्छेदन अहवालाची वाट पाहता या घटनेला आत्महत्येचे रूप दिले आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दुसरीकडे पोलिसांनी सांगितले की, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. फॉरेन्सिक टीमने तपास करत पुरावे गोळा केले आहेत. नवविवाहितेच्या नातेवाइकांची तक्रार आणि शवविच्छेदनाच्या अहवालाच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार आहे.