नवी दिल्ली :  Coronavirus कोरोना विषाणूनं गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. भारतातही या  विषाणूचा प्रादुर्भाव पाहायला मिळत असून, सुरुवातीला धीम्या गतीनं वाढणारा कोरोना रुग्णांचा आकडा आता झपाट्यानं वाढू लागला आहे. अर्थात देशाच्या काही भागांमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे हे नाकारता येणार नाही. असं असलं, तरीही रुग्णांचा वाढता आकडा हा देशाचा वाढता धोका अधोरेखित करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या नव्या आकडेवारीनुसार कोरोनाबाधितांची संख्या देशात आता साठ हजारांचा आकडा गाठण्याच्या मार्गावर आहे. सध्या कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ५९ हजार ६६२ वर पोहोचली आहे. 


वाचा : 'भारतीयांनी ऑफिसमध्ये जास्तवेळ काम केले तर अर्थव्यवस्था पटकन उभारी घेईल'


देशातील या हजारो कोरोनाबाधितांमध्ये ३९ हजार ८३४ रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर. १७ हजारहून अधिक रुग्णांनी या विषाणूवर मात केली आहे. कोरोनामुळं जीव गमावलेल्यांचा आकडा १९८१ च्या घरात पोहोचला आहे. मागील चोवीस तासांमध्ये कोरोनाच्या प्रसाराचा वेग पाहता, जवळपास ३३२० नव्या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. तर, चोवीस तासांच्या कालावधीत ९५ जणांना जीव गमवावा लागला.



 


एकिकडे कोरोना रुग्णांचा वाढता आकडा आरोग्य सेवा, शासनाच्या तणावास कारण ठरत असतानाच दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा काही अंशा का असेना पण, दिलासा देऊन जात आहे. शिवाय देशातील ४२ जिल्ह्यांमध्ये गेल्या २८ दिवसांपासून एकही कोरोना रुग्ण आढळला नसल्यामुळे ही सुद्धा प्रोत्साहनपर बाब ठरत आहे. नागरिकांनी स्वयंशिस्तीचं पालन केल्यास परिस्थिती बऱ्याच अंशी सुधारू शकते, ज्यामुळं प्रशासनही कोरोनाबाधित क्षेत्रांवर जास्त लक्ष केंद्रीत करु शकतं हा मुद्दा इथे अधोरेखित केला जाणं गरजेचं आहे.