Video : धावत्या ट्रेनमध्ये तुफान राडा! लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करुन ट्रेनमधून बाहेर फेकलं आणि...
Crime News : पश्चिम बंगालमध्येही यापूर्वी असाच काहीसा प्रकार समोर आला होता. भांडणानंतर चालत्या ट्रेनमधून तरुणाला फेकून दिल्यानतंर आरोपीने पाया पडल्या होत्या
Crime News : पश्चिम बंगालमध्ये काही दिवसांपूर्वी किरकोळ भांडणानंतर ट्रेनमध्ये एका व्यक्तीने एका तरुणाला चालत्या ट्रेनमधून फेूकन दिल्याचा व्हिडीओ समोर आला होता. या घटनेनंतर तरुण गंभीर जखमी झाला होता. बीरभूम जिल्ह्यातील तारापिठ रोड आणि रामपुरहाट रेल्वे स्थानकादरम्यान घडली होती. या घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. मोबाईच चोर (Mobile Thief) समजून एका तरुणाला काही प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून खाली फेकून दिले. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मारहाण करत रेल्वे बाहेर फेकून दिले
उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. मोबाईल चोर असल्याचे समजून एका तरुणाला मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला धावत्या ट्रेनमधून खाली फेकून देण्यात आले. कथित मोबाईल चोरीच्या आरोपाखाली त्याला आधी बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर प्रवाशांनी त्याला रेल्वेबाहेर फेकून दिले. दुर्दैवाची बाब म्हणजे त्या तरुणाचा दुसऱ्या बाजूने येणाऱ्या रेल्वेखाली येऊन मृत्यू झाला.
राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरो या स्वयंसेवी संस्थेने या घटनेचा व्हिडीओ ट्विट केला आहे. "ट्रेनमध्ये मोबाईल चोरल्याच्या आरोपावरून प्रवाशांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. शहाजहापूरच्या तिल्हारजवळ एका तरुणाला मारहाण केल्यानंतर चालत्या ट्रेनमधून फेकले आणि त्यात तरुणाचा मृत्यू झाला. हे प्रकरण अयोध्या-दिल्ली एक्स्प्रेसच्या सामान्य बोगीचे आहे. बरेली जंक्शन जीआरपीने आरोपीला अटक केली," असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.
लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण
या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.आरोपींनी कोठडीमध्ये पाठवण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत. रेल्वेतून खाली फेकण्याआधी या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. लाथा बुक्क्यांनी मारहाण होत असताना तो वारंवार माफी मागत होता. मात्र प्रवाशांनी त्याचे काही ऐकले नाही आणि त्याला ट्रेनबाहेर फेकून दिले.
आरोपींनी अटक
गेल्या आठवड्यात हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे. 14205 अयोध्या-दिल्ली एक्सप्रेस जनरल बोगी मध्ये एका महिला प्रवाशाच्या फोनची चोरी झाली होती. महिलेने आराडाओरडा केल्यानंतर प्रवाशांनी त्याची तपासणी केली तेव्हा त्याच्याकडे मोबाईल सापडला. त्यानंतर प्रवाशांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीनंतर काही जणांनी त्याला उचलून ट्रेनबाहेर फेकून दिले. मात्र दुसऱ्या ट्रेनखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.