नवी दिल्ली : मोठी चूक केला आहात... आता त्याच तोडीची शिक्षा भोगण्यास तयार राहा, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अवंतीपोरा हल्ल्याचा निषेध केला आणि पाकिस्तानला थेट इशारा दिला. नवी दिल्लीत माध्यांशी संवाद साधतेवेळी देशवासियांना संबोधित करत आणि हल्ला करणाऱ्या भ्याड पाकिस्तानचा उल्लेख करत या दुष्कृत्यात ज्यांचा सहभाग आहे त्यांना याची शिक्षा नक्की मिळणार असं त्यांनी खडसावून सांगितलं.  



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी जम्मू- काश्मीर येथील पुलवामातील अवंतीपोरा येथे करण्यात आलेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यामध्ये आतापर्यंत सीआरपीएफच्या ४४ जवानांना आपले प्राण गमावावे लागले. या शहीदांचं वीरमरण व्यर्थ जाऊ देणार नाही असा निर्धार मोदींनी व्यक्त करत पाकिस्तानला फैलावर घेतलं. आता दहशतवादाला उलथून पाडण्यासाठीचटा लढा आणखी आवेगाने लढला जाईल असं म्हणत ही वेळ साऱ्या देशाने एकत्र येऊन परिस्थितीचा सामना करण्याची असल्याचं ते म्हणाले. मोदी सरकारची निंदा करणाऱ्यांची भूमिकाही आपल्याला मान्य असल्याचं म्हणत निदान सध्याच्या अतिसंवेदनसील घडीला राजकारण दूर ठेवावं अशी विनंती त्यांनी केली.



भारतात अशा कृत्यांच्या मदतीने अस्थिरता निर्माण करता येऊ शकते असं स्वप्न जर शेजारी राष्ट्र (पाकिस्तान) पाहात असेल तर हे स्वप्न विसरा, असं सूचक विधा करत पाकिस्तानचा पाय किती खोलात आहे याकडे मोदींनी लक्ष वेधलं. सद्यस्थितीला मोठ्या मोठ्या आर्थिक संकटातून जाणाऱ्या आपल्या शेजारी राष्ट्राचे मनसुबे कधीच पूर्ण होणार नाहीत कारण, ते ज्या वाटेवर चालत आहेत ती विनाशाचीच वाट आहे, ही बाब मोदींनी मांडत अशा प्रत्येक हल्ल्याचं सडेतोड उत्तर देणार असल्याची भूमिका स्पष्ट केली. शहीदांना आदरपूर्वक श्रद्धांजली वाहत मोदींनी यावेळी भारतासोबत उभ्या असणाऱ्या आणि दहशतवादाविरोधी आवाज उठवणाऱ्या प्रत्येक राष्ट्राचे मनापासून आभार मानले. ही वेळ पाहता सर्वत्र दु:ख आणि आक्रोशाचं वातावरण आहे. पण, तरीही हा देश थांबणार नाही हा विश्वास त्यांनी व्यक्त केला.