VIDEO : उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल, पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्यही सोबत
अयोध्येत पुढचे दोन दिवस तणावग्रस्त वातावरण राहण्याची शक्यता
मुंबई : आपल्या नियोजित अयोध्या दौऱ्यासाठी नुकतेच उद्धव ठाकरे सहकुटुंब फैजाबाद विमानतळावर दाखल झालेत. त्यानंतर ते एका पांढऱ्या रंगाच्या गाडीत बसून पुढच्या कार्यक्रमसाठी रवाना झालेत. यावेळी गाडीत उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरे पहिल्या सीटवर बसलेले होते... तर मागच्या सीटवर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे बसलेले होते. इथून ते पंचवटी हॉटेलमध्ये पोहचले. रामाची जन्मभूमी अयोध्येत शनिवारी हालचालींना वेग आलाय. राम मंदिराच्या निर्माणाची मागणी घेऊन शिवसेना आणि विश्व हिंदू परिषद वेगवेगळे कार्यक्रम करत आहेत. दरम्यान, धास्तावलेल्या मुस्लिम समुदायाच्या लोकांनीही या दरम्यान काहीतरी अनर्थ घडू शकण्याच्या शक्यतेमुळे आपल्या घरात गरजेच्या वस्तू जमवणं सुरू केलंय. अयोध्येत पुढचे दोन दिवस असंच वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली जातेय.
अधिक वाचा :- उद्धव ठाकरेंच्या निर्विघ्न दौऱ्यासाठी देवासमोर गाऱ्हाणी आणि आरत्या
लवकरच सरयू तीरावर होणार दाखल
लवकरच उद्धव ठाकरे साधुसंतांची भेट घेऊन सायंकाळी ६ वाजता सरयू घाटावर आरतीत सहभागी होतील. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगा आदित्य ठाकरे हेदेखील उपस्थित असणार आहेत. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजल्याच्या सुमारास ते राम जन्मभूमीत रामललाचे दर्शन करतील. शिवसेनेच्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दोन रेल्वे भरून शिवसैनिक अयोध्येत दाखल झालेत. पहिली रेल्वे काल पोहचली होती तर दुसरी रेल्वे आज सकाळी ७.१५ वाजता अयोध्येत दाखल झाली.
अधिक वाचा :- अयोध्येच्या परिस्थितीवर सीएम योगींचा मोठा निर्णय? बोलावली तातडीची बैठक
याशिवाय विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसभेला दोन लाख लोक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. अयोध्येत अचानक झालेल्या गर्दीमुळे वातावरण तणावपूर्ण झालं आहे. शहरातील स्थिती बिघडण्याची भीती स्थानिक व्यक्त करत आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अयोध्येत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलंय. चोख बंदोबस्तामुळे अयोध्येला छावणीचं स्वरुप प्राप्त झालंय. उद्धव साधूसंतांसोबत राम मंदिराच्या उभारणीबद्दल चर्चा करणार आहेत. या दौऱ्यासाठी शिवसेनेनं 'हर हिंदू की एकही पुकार, पहले मंदिर फिर सरकार,' अशी घोषणा दिली आहे.
अधिक वाचा :- अयोध्येत तणाव : 70 हजार सुरक्षकर्मी तैनात, शाळा-कॉलेज बंद
डॉक्टरांचं पथकही अयोध्येत दाखल
राममंदिरांच्या मागणीसाठी शिवसेना आक्रमक झालीय. पहले मंदिर फिर सरकार असा नारा देत हजारो शिवसैनिक अयोध्यानगरीत दाखल झालेत. महाराष्ट्रातून विशेष एक्स्प्रेस ट्रेनने शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी शिवसैनिक अयोध्येत पोहचलेत. या शिवसैनिकांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांचं विशेष पथकही अयोध्येत दाखल झालंय. या डॉक्टरांकडून शिवसैनिकांची तपासणी करण्यात येतेय.
राम मंदिराच्या मुद्द्यावरून अयोध्येत वातावरण तापलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि शिवसेनेचे कार्यकर्ते रविवारी या शहरात मोठ्या संख्येने पोहचतील. आरएसएस-व्हीएचपीचे दोन लाखांहून अधिक कार्यकर्ते अयोध्येत एकत्र येतील, असा दावा केला जातोय.
अधिक वाचा :- अयोध्येत लष्कराला पाचारण करा; अखिलेश यादवांची मागणी
लाखोंच्या संख्येनं नागरिक अयोध्येत एकत्र
संघाचे जवळपास एक लाख, तसेच विश्व हिंदू परिषदेचेही तितकेच कार्यकर्ते अयोध्येत पोहोचणार आहेत. याशिवाय साधू-संतही मोठ्या संख्येने येतील. अयोध्येत आरएसएसनं धर्मसभेचं आयोजनही केलं आहे. या सभेला मुस्लीमही मोठ्या संख्येनं येणार आहेत. त्यांची जबाबदारी मुस्लीम राष्ट्रीय मंचाकडे सोपवण्यात आली आहे. जवळपास ३ हजार मुस्लीम समाजातील लोक या धर्मसभेला येतील. त्यात महिलांची संख्याही लक्षणीय आहे.
अधिक वाचा :- अयोध्येतील नागरिक धास्तावले; घरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा साठा
शिवसेनेनं इथं 'आशिर्वाद मेळाव्या'चं आयोजन करत आहे तर विहिंपनं रविवारी धर्मसभेचं आयोजन केलंय. यासाठी शेकडो शिवसैनिक महाराष्ट्रातून दोन रेल्वेंतून अयोध्येत दाखल झालेत. दरम्यान, अयोध्येत शनिवारी शिवसेना आणि रविवारी होणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमामुळे वातावरण तणावग्रस्त झालंय. याच दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी एक महत्त्वाची बैठक बोलावलीय. ही बैठक शनिवारी लखनऊमध्ये सायंकाळी उशिरा आठ वाजता होणार आहे. या दरम्यान मुख्यमंत्री योगी एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जातेय.