अयोध्येत तणाव : 70 हजार सुरक्षकर्मी तैनात, शाळा-कॉलेज बंद

शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्यात आले असून शहरातील 50 शाळांमध्ये सुरक्षाकर्मींचे कॅंप लावण्यात आले आहेत. 

Updated: Nov 24, 2018, 08:38 AM IST
अयोध्येत तणाव : 70 हजार सुरक्षकर्मी तैनात, शाळा-कॉलेज बंद  title=

अयोध्या : उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येतील राम मंदिर मुद्दयावरून सुरू झालेलं राजकारण चांगलच तापलेलं दिसतंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 'आशीर्वाद उत्सव' साठी आज दुपारी अयोध्येत पोहोचत आहेत. दोन ट्रेन भरून हजारोंच्या संख्येने शिवसैनिकही अयोध्येत पोहोचले आहेत. रविवारी विश्व हिंदू परिषदेतर्फेही धर्मसभेचं आयोजन करण्यात आलंय. दोन्ही कार्यक्रम पाहता सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे. प्रशासनाने 70 हजार सुरक्षाकर्मी इथे तैनात केले आहेत. रेल्वे स्थानकावरही मोठ्या प्रमाणात पोलीस बल तैनात आहे. अयोध्येत कलम 144 लागू झालंय. तसेच शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्यात आले असून शहरातील 50 शाळांमध्ये सुरक्षाकर्मींचे कॅंप लावण्यात आले आहेत.

कमांडो आणि ड्रोन कॅमेऱ्यांची नजर

अयोध्येत वाढलेल्या तणावामुळे मुस्लिम समुदायात तणावाचे वातावरण असल्याचं सांगण्यात येतयं.  सुरक्षा व्यवस्था राखण्यासाठी एक अपर महानिदेशक स्तराचा अधिकारी, एक उप पोलीस महानिरीक्षक, तीन वरिष्ठ पोलीस अधिक्षक,10 अपर पोलीस अधिक्षक, 21 क्षेत्राधिकारी, 160 इंस्पेक्टर, 700 कॉंस्टेबलस, पीएसीच्या 42 तर आरएएफचे पाच दल तैनात आहेत. याव्यतिरिक्त एटीएसचे कमांडो आणि ड्रोन कॅमेऱ्यांची नजरही असणार आहे.

रविवारी विहिंपचा कार्यक्रम 

अयोध्येत विश्व हिंदू परिषदेतर्फे (विहिप) धर्मसभा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय. शिवसेनेचा होणारा कार्यक्रम पाहता अयोध्येत तणावपूर्ण शांतता आहे. सर्व शाळा-महाविद्यालय बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच मोठ्या संख्येत सुरक्षाकर्मी तैनात करण्यात आले आहेत.

अयोध्या तणावात 

सर्वोच्च न्यायालयानं अयोध्या प्रकरणाची सुनावणी जानेवारीपर्यंत पुढे ढकलल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना राम मंदिराच्या मुद्यावरुन आक्रमक झाल्या आहेत. हिंदुत्तवादी संघटनांकडून अयोध्येत सभांचं आयोजन करण्यात येतं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज आणि उद्या अयोध्येचा दौरा करणार आहेत.

या पार्श्वभूमीवर अयोध्येत तणावपूर्ण स्थिती आहे. एखादी अनुचित घटना होण्याची भीती लोकांना सतावते आहे. त्यामुळे अनेकांनी जीवनावश्यक वस्तू घरी आणून ठेवल्या आहेत. काही दिवस घरीच राहावं लागल्यास कोणतीही अडचण येऊ नये, याची तयारी स्थानिकांनी केली आहे.

वातावरण चिघळणार ?

 उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हजारो शिवसैनिक अयोध्येला पोहोचले आहेत. याशिवाय विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसभेला दोन लाख लोक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. अयोध्येत अचानक झालेल्या गर्दीमुळे वातावरण तणावपूर्ण झालंय.

शहरातील स्थिती बिघडण्याची भीती स्थानिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे अनेकांनी घरात जीवनाश्यक वस्तू गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

साधूसंतांसोबत चर्चा 

उद्धव ठाकरे शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरील मातीचा कलश घेऊन अयोध्येला पोहोचत आहेत. शिवनेरी किल्ल्यावरील मातीनं भरलेला कलश उद्धव ठाकरे राम जन्मभूमी स्थळावरील महंतांकडे सोपवतील. याशिवाय ते साधूसंतांसोबत राम मंदिराच्या उभारणीबद्दल चर्चा करणार आहेत.

अयोध्येत रामलल्लाचं दर्शन केल्यावर ते शरयूच्या काठावर पूजा करतील. या दौऱ्यासाठी शिवसेनेनं 'हर हिंदू की एकही पुकार, पहले मंदिर फिर सरकार,' अशी घोषणा दिलीयं.