Viral Video: निसर्ग म्हणजे एक न उलगडेलं कोडं असून, तो तुम्हाला कधी काय दाखवेल हे सांगू शकत नाही. कधी निसर्ग तुमच्या डोळ्यांचं पारणं फेडणारं सौंदर्य दाखवतं, तर कधी संकटांचा डोंगर निर्माण करतं. याच निसर्गातील प्राणी, पक्षीही कधीतरी आपल्या गुणधर्मापेक्षा वेगळं वागत सर्वांना आश्चर्यचकित करतात. दरम्यान असाच एक आश्चर्यकारक आणि सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आश्चर्यकारक यासाठी कारण या व्हिडीओत चक्क साप आणि गाय एकमेकांसोबत खेळत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साप दिसला की भीती वाटणं साहजिक आहे. त्यात साप समोर आला तर तो दंश करणारच अशी भीती असल्याने अनेकजण त्याला ठेचून ठार मारतात. पण ट्विटरला एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहिल्यानंतर तुमचा गैरसमज दूर होईल आणि आश्चर्याचा धक्का बसेल. हा व्हिडीओ भारतीय वन अधिकारी सुसंता नंदा यांनी शेअर केला आहे.  


या व्हिडीओ एक साप आणि गाय दिसत आहे. साप खाली जमिनीबर निवांत बसलेला असताना, गायदेखील त्याच्याशी अत्यंत निवांतपणे खेळताना दिसत आहे. 17 सेकंदाची ही क्लिप अनेकांच्या भुवया उंचावत आहे. व्हिडीओच्या शेवटी तर गाय सापाला चाटतानाही दिसत आहे. पण यादरम्यान सापाला कोणताही धोका वाटत नाही आणि तो शांतपणे बसून राहतो. 


सुसंता नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन दिली आहे की, "समजावणं कठीण आहे, पण खऱ्या प्रेमानेच तुम्ही विश्वास संपादन करु शकता".



व्हिडीओत साप आणि गाय ज्या निवांतपणे आणि अजिबात संघर्ष न करता एकमेकांशी खेळत आहेत ते पाहताना चेहऱ्यावर हसू उमटतं. या व्हिडीओला फक्त 15 तासात 3 लाखांहून अधिक व्ह्यू मिळाले आहेत. तसंच 5 हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे. 


"निसर्ग गुंतागुंतीचा आहे. तुम्ही केवळ अनुभवातूनच निसर्गाला समजून घेऊ शकता. मला निसर्गाचे निरीक्षण करायला आवडते आणि आजही जेव्हा काही गोष्टी अचानक आठवतात तेव्हा त्या मला मंत्रमुग्ध करतात," अशी कमेंट एका युजरने केली आहे.


"ऐक्याचं हा सुंदर भाव आहे. आजच्या जगात, मानवतेने या सुंदर आत्म्यांकडून शिकले पाहिजे," अशी कमेंट एकाने केली आहे.


"गाय आणि साप दोघांचेही वर्णन न करता येणारे वर्तन, परंतु त्यांची स्वतःची भाषाही आहे, जी मानवी समजण्याच्या पलीकडे आहे," असं एकाने म्हटलं आहे. दरम्यान काहींनी या व्हिडीओच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. "हा तयार केलेला एक व्हिडिओ आहे. दरवर्षी सर्पदंशामुळे अनेक प्राण्यांचा मृत्यू होतो. तरीही आमच्याकडे यावर कोणताही विश्वासार्ह डेटा नाही," अशी कमेंटट एका युजरने केली आहे.