नवी दिल्ली : ग्रेटर नोएडातील नॉलेज पार्क भागातील एका सलून मालकाने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून एका महिला मेकअप आर्टिस्टला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणीने मालकाकडे तिचा पगार मागितल्याने त्याने मारहाण केल्याचं समोर आलं आहे. पीडित तरुणी ग्रेटर नोएडातील नॉलेज पार्क येथील एका सलूनमध्ये काम करते. या तरुणीने मार्च महिन्यापासून इथे काम करण्यास सुरुवात केली होती. परंतु सलून मालकाने तिला अद्याप कोणताही पगार दिलेला नव्हता. या तरुणीने तिच्या पगाराबाबत विचारणा केली त्यावेळी त्याने काहीही उत्तर दिलं नाही. त्यामुळे तरुणी पुन्हा काही वेळाने पगार मागण्यासाठी गेली त्यावेळी सलून मालकाने रागात त्या तरुणीला मारहाण करण्यास सुरुवात केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलून मालकाने तरुणीचे केस पकडून तिला सलूनच्या बाहेर काढलं आणि भररस्त्यात तिला काठ्या-दंड्याने मारण्यास सुरुवात केली. एवढंच नाही तर तिच्यासोबत असलेल्या तिच्या सहकाऱ्यांनीही तिला मारहाण केली. तिचे केस पकडून, लाथा-काठ्यांनी तिला मारलं. यादरम्यान रस्त्यावरील लोक केवळ बघ्याची भूमिका करत त्या मारहाणीचा व्हिडिओ बनवत होते. एकानेही तिला मदत करण्याचा प्रयत्न केला नाही. तरुणीने कसंबसं या सगळ्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका केली.


(हा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा)


स्वत:चा जीव वाचवत तरुणीने पोलिसांत धाव घेतली आणि संपूर्ण प्रकाराबाबत माहिती दिली. पोलिसांनी ३२३, ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपींपैकी एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.