नवी दिल्ली: आम्ही राम मंदिराच्या उभारणीसाठी भीक मागत नाही, सरकारने कायदा करावा, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मोदी सरकारला इशारा देण्यात आला. संघाचे ज्येष्ठ नेते भय्याजी जोशी यांनी रविवारी दिल्लीच्या रामलीला मैदानावर विश्व हिंदू परिषदेच्या ( विहिंप) कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी अध्यादेश लागू करण्याची मागणी केली. काही दिवसांपूर्वीच सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी आणखी धीर धरता येणार नाही, असे सांगत कार्यकर्त्यांना जनांदोलन उभारण्याचे आवाहन केले होते. 
 
 यानंतर भय्याजी जोशी यांनी पुन्हा एकदा संघाच्यावतीने सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने आपली प्रतिष्ठा कायम राखली पाहिजे. लोकांच्या भावनेचा आदर करायला हवा. सत्तेत बसणाऱ्या लोकांनी राम मंदिर बांधण्याची घोषणा केली. आता हे आश्वासन पाळण्याची वेळ आली आहे. सरकारनं सोडलेला संकल्प पूर्ण करायला हवा. सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या भावनांचा आदर करायला हवा. आम्ही भीक मागत नाही, असे त्यांनी सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयातील राम मंदिर-बाबरी मशीद खटल्यातील पक्षकार आणि भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही शनिवारी सरकार पाडण्याचा इशारा दिला होता. जानेवारी महिन्यात न्यायालयात राम मंदिराचा मुद्दा सुनावणीसाठी येईल. त्यानंतर आम्ही हा खटला दोन आठवड्यात सहज जिंकू. तेव्हा आमच्यासमोर केवळ दोनच प्रतिस्पर्धी असतील, एक म्हणजे मोदी सरकार आणि योगी सरकार. हे दोन्ही पक्षकार माझ्याविरोधात भूमिका घेतील का? ते कदापि असे पाऊल उचलणार नाहीत. मात्र, तरीही त्यांनी असे केलेच तर मी त्यांचे सरकार पाडेन, असा इशारा स्वामी यांनी दिला. 


आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या तोंडावर राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशातील वातावरण कमालीचे तापले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विहिंप या संघटनांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी संसदेत अध्यादेश आणण्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे सरकारवरील दबाव दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्याच महिन्यात भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेला अयोध्या दौराही चांगलाच गाजला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी 'पहले मंदिर, फिर सरकार', असा नारा दिला होता.