IMD Weather Update in India: महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सध्या सातत्यानं होणारे बदल पाहता हवामानाचा नेमका अंदाज लावणंही कठीण झालं आहे. उन्हाळ्यात देशातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी असल्यामुळं नेमका ऋतू कोणता हाच प्रश्न आता नागरिकांच्या मनात घर करू लागला आहे. एकामागून एक येणारे पश्चिमी झंझावात आणि त्यामुळं बरसलेल्या पाऊसधारा यामुळं उष्णतेचा दाह काहीसा कमी झाला. पण, गेल्या काही दिवसांपासून दिसणारं हे चित्र आता बदलण्यास सुरुवात होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान विभागाच्या माहितीनुसार देशभरात येत्या दिवसांत तापमान 32 ते 40 अंशांदरम्यान राहू शकतं. अर्ध्याहून अधिक देशामध्ये कोरडे वारे वाहण्यास सुरुवात होऊ शकते. आता सुरु होणाऱ्या तापमानवाढीचं हे सत्र जूनपर्यंत असंच सुरू राहिल असाही अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. (Weather Update unseasonal rain rise in temprature Maharashtra climate changes )


कडाक्याचं ऊन आणि बरंच काही... 


हवामान विभागाच्या माहितीनुसार 17 एप्रिलनंतर देशाच्या बहुतांश क्षेत्रांमध्ये तापमान 40 अंशाचा टप्पाही ओलांडू शकतं. ज्यामुळं नागरिकांना उष्णतेपासून बचावासाठीचे उपाय योजण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. दरम्यान देशात तापमान वाढीची शक्यता असली तरीही तूर्तास उष्णतेच्या लाटांचा कोणताही अंदाज किंवा इशारा हवामान विभागानं दिलेला नाही. 


हेसुद्धा वाचा : शेतकऱ्यांसाठी चिंतेत टाकणारी बातमी!


 


सहसा उष्णता वाढू लागल्यानंतर उष्णतेच्या लाटांबाबतची घोषणा करण्यासाठी हवामान विभागाकडून काही निकषांचा आधार घेतला जातो. यामध्ये पर्वतीय भागात 30 अंश, किनारपट्टी भागात 37 अंश आणि मैदानी भागात 40 अंशांवर तापमान गेल्यास उष्णतेच्या लाटेची घोषणा केली जाते. 


पुढच्या 10 दिवसांमध्ये देशात उन्हाळा की पावसाळा? 


सध्या देशात उष्णतेच्या लाटांची (Heat Wave) शक्यता नसली तरीही उन्हाचा दाह मात्र कायमच जाणवणार आहे. स्कायमेटच्या वृत्तानुसार पुढील 10 दिवस देशात कोणताही पश्चिमी झंझावात सक्रिय नसेल. कोरडे वारे वाहतील. अवकाळीचं प्रमाण काही अंशी कमी असेल आणि नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. 


महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस 


नुकतंच (Skymet) स्कायमेटकडून यंदाच्या वर्षी होणाऱ्या पर्जन्यमानाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. जिथं महाराष्ट्रात यंदा सरासरीहून काही टक्के कमी पाऊस होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. मागील चार वर्षांमध्ये अल निनोमुळं पर्जन्यमान समाधानकारक होतं. पण, यंदा मात्र सरासरीच्या 94 टक्के पाऊस होणार आहे. जुलै ते ऑगस्ट या महिन्यांमध्ये महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये पावसाचं प्रमाण कमीच असेल.