What is the Origin of Dosa : डोसा... कमालीच्या तापलेल्या लोखंडी तव्यावर तांदूळ आणि डाळीच्या पीठाचं मिश्रण टाकून शक्य तितका मोठा वर्तुळ तयार करत तो खरपूर होईपर्यंत शिजवणं आणि मोठ्या कसबीनं हा खमंग वर्तुळ पलटत त्याची घडी मारणं. विविध आंबट- तिखट चटण्यांच्या सोबतीनं तो गट्टम करणं... ही साधारण डोसा ताटात पडून तो फस्त होईपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोसा बहुविध रुपात आणि प्रकारात आजवर अनेकांचीच भूक आणि जीभेचे चोचले  पुरवत आला. आरोग्यदायी गुणांमुळं आहारतज्ज्ञांनीही डोसा प्राधान्यस्थानी ठेवला. असा हा डोसा, त्याचं वय किती माहितीये? असं म्हणतात आणि असे संदर्भही आढळतात की डोसा सर्वप्रथम दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यात तयार करण्यात आला होता. 


इतिहासकार पी थंकप्पन यांच्या माहितीनुसार डोसा सर्वप्रथम पाचव्या शतकामध्ये तयार करण्यात आला होता. हा पदार्थ तयार करणारे आचारी मुळचे (Karnataka) कर्नाटकातील उड्डपी येथील रहिवासी होते. सुरुवातीच्या काळात डोसा पातळ आणि कुरकुरीत नव्हे, तर मऊ आणि काहीसा जाड बनवला जात असे. 


प्राचीन काळामध्ये कर्नाटकातील उड्डपी मंदिरानजीकच्या चिंचोळ्या वाटा डोसासाठी प्रसिद्ध होत्या. तामिळ साहित्यामध्येही याचा संदर्भ आढळतो. ही झाली डोसा, या पदार्थाच्या जन्माची कहाणी. राहिला मुद्दा म्हैसूर मसाला डोसाचा तर याच्या इतिहासाची पाळंमुळं मैसूरचे महाराजा वडयार यांच्याशी जोडला गेला आहे. 


हेसुद्धा वाचा : मध्य आशिया ते भारत... तुमच्या आवडीचा समोसा कोणत्या देशाचा? 


 


दरम्यान, अनेक जाणकार असंही म्हणतात की, डोसाचा जन्म उड्डपीमध्ये झाला असून तो सर्वप्रथम एका ब्राह्मण आचाऱ्यानं बनवला होता. अशी मान्यता आहे की, ब्राह्मण समाजात मद्यप्राशनास परवानगी नाही, ज्यामुळं त्यांनी तांदळाशी खमीरची सांगड घालत डोसा तयार करण्याची शक्कल लढवली. 


सुरुवातीच्या काळात डोसा हा अगदी साध्या स्वरुपात खाल्ला आणि पसंत केला जाई. त्यामध्ये विविध मिश्रणं मिसळली जात नव्हती. साधा डोसा बटाट्याच्या भाजीसोबत खायला दिला जात असे. त्यावेळी सांभारासोबत डोसा खाण्याची पद्धतच अस्तित्वात नव्हती. आहे की नाही डोसा नेमका जन्माला कसा आला याची कहाणी?