मुंबई : अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना तातडीने अंतरिम जामीन देण्यास हायकोर्टाने गुरुवारी नकार दिला. मूळ तक्रारदार आणि पोलिसांचं म्हणणं ऐकल्याशिवाय अंतरिम दिलासा देण्याचा निर्णय दिला जाऊ शकत नाही असे न्यायालयाने म्हटलं. अन्वय यांच्या पत्नी अक्षता यांना प्रतिवादी करण्याचे आदेशही न्यायालयाने दिलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यायालयाचा शुक्रवारी कामकाजाचा शेवटचा दिवस असून त्यानंतर दिवाळीची सुटी सुरू होईल. त्यातच अलिबाग न्यायालयाने जामिनावरील सुनावणी कधी घेणार हे स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे अर्णब यांना तातडीने अंतरिम जामीन मंजूर करावा अशी विनंती त्यांचे वकील अबाद पोंडा यांनी केली होती.  शुक्रवारी सर्व पक्षकारांचं म्हणणं ऐकल्यावरच निर्णय दिला जाईल असं न्यायालयाने म्हटलंय. 



अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी नाईक कुटुंबांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू करावा या मागणीसाठी नाईक कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दुसरीकडे या प्रकरणाचा तपास पोलिसांनी बंद करून तसं न्यायालयाला कळवलं आहे.


त्यामुळे हे प्रकरण बंद करावं आणि अर्णब गोस्वामी यांना मुक्त करावं या करता अर्णब यांचे कुटुंबीयही उच्च न्यायालयात गेले आहेत. अर्णब गोस्वामी यांना अटक केल्याप्रकरणी महाराष्ट्र मानवाधिकार आयोगानं रायगडच्या पोलीस अधीक्षकांना नोटीस बजावलीय. पोलीस अधीक्षकांना आज सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे आदेश मानवाधिकारआयोगानं दिले आहेत.