प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : कलाकारांसह म्हाडा कर्मचारी आणि शासकीय कर्मचाऱ्यांना लवकरच म्हाडाची लॉटरी लागणार आहे. रत्नागिरी येथे झालेल्या म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय झाला असून रत्नागिरी जिल्ह्यासाठी तब्बल 400 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. पोलिसांच्या घराचा प्रश्न देखील मार्गी लागला असून त्यांच्या वसाहतीसाठी 155 कोटींची तरतूद करून त्याची शिफारस शासनाकडे केल्याची माहिती म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


महत्त्वाचे निर्णय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिपळूण आणि दापोली येथील घर बांधणीसाठी 95 कोटींना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून कोकण नगर येथे बॅडमिंटन हॉल, सभागृह, रस्ते आणि गटार बांधणीला 11 कोटी मंजूर करण्यात आले.



पोलीस वसाहतीसाठी 155 कोटींच्या तरतूदीची शिफारस केली. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी 10 कोटींची तरतूद करून त्याबाबतचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांसाठी दिले. 


दापोली येथें 300 घरं, चिपळूण येथे 400 घरं आणि एक नाट्यगृह आणि रत्नागिरीत दोन नवीन प्रोजेक्ट लवकरच सुरू होणार आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे 160 घरांची योजना राबविण्यात येणार आहे. 


कलाकारांसह पत्रकार, म्हाडा कर्मचारी, शासकीय कर्मचाऱ्यांनी म्हाडाकडे केलेली मागणी मान्य करत कलाकारांसाठी तीनशे, पत्रकारासाठी दोनशे, 200 तर म्हाडा तसेच शासकीय कर्मचार्यांसाठी दोनशे घरे विरारमध्ये उपलब्ध करून दिली जाणार असल्याची घोषणा सामंत यांनी यावेळी केली. या बैठकीला म्हाडा उपाध्यक्ष मिलींद म्हैसकर, सभापती विनोद घोसाळकर, कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील, मुबंई म्हाडा मुख्यधिकारी राधाकृष्णन बी. आणि इतर अधिकारी उपस्थित होते.