ठाणे: बदलापूर नजीकच्या चंदेरी डोंगरावर अडकलेल्या सहा गिर्यारोहकांची पोलिसांनी सुटका केली आहे. हे सहाही पर्यटक एअर इंडियामध्ये प्रशिक्षणार्थी आहेत. ते नाशिक आणि पुणे येथील इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी आहेत. शनिवारी सकाळी सर्वजण ट्रेकिंगसाठी चंदेरीला गेले होते. त्यातील फक्त एकालाच ट्रेकिंगची माहिती आहे. बाकी सगळे हौशी गिर्यारोहक होते. जोरदार पावसामुळे ते रस्ता चुकले. 


मोबाईलला रेंज नसल्याने तसेच मुसळधार पाऊस पडत असल्याने रात्रभर ते एका झाडाखाली बसून राहिले. सकाळी अडकलेल्यांपैकी अब्राहमने कसाबसा फोनवरून मित्रांशी संपर्क साधला आणि आपण अडकल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या सगळ्यांची सुखरूप सुटका केली.