`आठवड्यातून 90 तास काम करा`वरुन दीपिकाने थेट L&T अध्यक्षांना सुनावलं; म्हणाली, `मोठ्या पदावरील...`
Deepika Padukone On L&T Chairman Comment: कर्मचाऱ्यांनी रविवारीसुद्धा काम करायला हवं असं मत नोंदवणाऱ्या या अधिकाऱ्यावर अभिनेत्री संतापल्याचं दिसत आहे.
Deepika Padukone On L&T Chairman Comment: बांधकाम आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जगप्रसिद्ध कंपनी असलेल्या 'लार्सन अँड टुब्रो' म्हणजेच 'एल अँण्ड टी'चे अध्यक्ष एसएन सुब्रमण्यन सध्या देशभरामध्ये चर्चेत आहेत. एसएन सुब्रमण्यन चर्चेत येण्यामागील कारण म्हणजे त्यांनी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासंदर्भात व्यक्त केलेलं मत! अनेकांनी एसएन सुब्रमण्यन यांनी व्यक्त केलेलं मत फारच चुकीचं असल्याचं म्हटलं असतानाच आता अभिनेत्री दीपिका पादुकोणनही यावर व्यक्त झाली आहे.
नेमकं काय म्हणाले एसएन सुब्रमण्यन?
एसएन सुब्रमण्यन यांना एका कार्यक्रमादरम्यान 'लार्सन अँड टुब्रो'ची अब्जावधींची उलाढाल असूनही इथल्या कर्मचाऱ्यांना शनिवारीसुद्धा कामावर यावं लागतं, असं म्हणत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना एसएन सुब्रमण्यन यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून 90 तास काम केलं पाहिजे असं मत व्यक्त केलं. तसेच रविवारी घरी बसून किती वेळ बायकोला पाहत राहणार त्याऐवजी कर्मचाऱ्यांनीह रविवारीही काम केलं पाहिजे असंही मत नोंदवलं. "मला खंत आहे की मी लोकांना रविवारीसुद्धा कामावर बोलवू शकत नाही. मी त्यांना रविवारीसुद्धा कामावर बोलवू शकतो तर मला नक्कीच आनंद होईल' असं आश्चर्यकारक उत्तर एसएन सुब्रमण्यन यांनी दिलं.
दिवसाला साडेबारा तास काम करावं अशी इच्छा
दिवसाचे 24 तास या हिशोबाने आठवड्यातील सात दिवसांमधील 168 तासांपैकी 90 तास कर्मचाऱ्यांनी काम करावं असं एसएन सुब्रमण्यन यांचं म्हणणं आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास कामाचा सहा दिवसांचा आठवडा गृहित धरल्यास दिवसाला साडेबारा तास काम करणं अपेक्षित असल्याचं मत एसएन सुब्रमण्यन यांनी व्यक्त केलं.
दीपिका पादुकोणही संतापून म्हणाली...
वेगवेगळ्या स्तरातून एसएन सुब्रमण्यन यांच्या या विधानावर टीका होताना दिसत आहे. अनेकांनी कर्मचाऱ्यांना खासगी आयुष्य आहे की नाही असा सवाल उपस्थित केला आहे. वर्क लाईफ बॅलेन्स असा काही प्रकार या महाशयांना ठाऊक नाही का? असंही काहींनी खोचकपणे विचारलं आहे. या साऱ्यादरम्यान दीपिका पादुकोणनेही आपलं मत सोशल मीडियावरुन व्यक्त केलं आहे. "एवढ्या मोठ्या पदावरील व्यक्तीने असं बोलणं फारच धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया दीपिकाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन नोंदवली आहे. दीपिकाने यावर 'मेंटल हेल्थ मॅटर्स' म्हणजेच मानसिक आरोग्य महत्त्वाचं आहे, असा हॅशटॅगही प्रतिक्रिया नोंदवताना वापरला आहे. दीपिकाच्या पोस्टची शैली आणि तिने वापरलेल्या 'शॉकिंग' या शब्दावरुन तिने ही प्रतिक्रिया संतापून नोंदवल्याची चर्चा आहे. दीपिकाने एका महिला पत्रकराने लार्सन अँड टुब्रो कंपनीचे एसएन सुब्रमण्यन यांनी नोंदवलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात पोस्ट शेअर करत आपलं मत नोंदवलं आहे.
दरम्यान, एसएन सुब्रमण्यन यांच्या प्रतिक्रियेनंतर 'लार्सन अँड टुब्रो'ने स्पष्टीकरण देताना राष्ट्रनिर्माण हे आमच्यासाठी सर्वोच्च असल्याचं अध्यक्षांना सूचित करायचं होतं अशा अर्थाचं विधान केलं आहे.